sangli news: खटावमध्ये संक्रांतीला तिळगुळाबरोबर पोती भरुन वाटतात साखर, दीड-दोनशे वर्षांपासूनची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:01 PM2023-01-18T12:01:22+5:302023-01-18T12:07:42+5:30
नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप
लिंगनूर : खटाव (ता. मिरज) येथील मकर संक्रांतीचा सण अवघ्या महाराष्ट्रात कदाचित सर्वाधिक गोड ठरला असावा. कारण यंदा सणानिमित्त गावकऱ्यांनी थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल १७० पोती साखर वाटून तोंड गोड केले.
गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून खटावमध्ये संक्रांतीनिमित्त साखर वाटपाची अनोखी परंपरा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रातीला हा अनोखा सोहळा साजरा होतो. काळ बदलला, तरी खटावकरांनी परंपरेचा विसर पडू दिला नाही. संक्रांतीला गावोगावी तिळगूळ वाटप होते, खटावचे ग्रामस्थ मात्र पोती भरभरुन साखर वाटतात. त्यात तीळगूळ ही मिसळतात.
ग्रामदैवत सोमेश्वर व अमोघसिद्ध देवांच्या पालखीसमोर वाटप होते. घरटी किमान दोन किलो साखर हमखास वाटली जाते, शिवाय नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप भाविक करतात. त्यामुळे संक्रांतीच्या अगोदर काही दिवस गावातील व्यापारी तीळगूळ ऐवजी साखरेचाच घाऊक साठा करुन ठेवतात.
संक्रांतीला देवांची पालखी जवळच्याच ऐनापूर (ता. अथणी) गावात सिद्धेश्वराच्या भेटीला नेली जाते. तेथे कृष्णा नदीत स्नान घालून सकाळी गावात आणतात. गावाजवळ येईल, तशी पालखी पळवतात. फटाक्यांच्या आतषबाजीत व धनगरी ढोलांच्या निनादात गावकरी स्वागत करतात.
किंक्रांतीला दिवसभर पालखी गावाबाहेर सोमेश्वर मंदिरात थांबते. सायंकाळी आंबील, भाताचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी गावातील मंदिराच्या मैदानात येते. तेथे गावकरी पहिली साखर देवाला देतात. भक्तांच्या साखरेने पालखी भरुन जाते. त्यानंतर गावभर साखर वाटपाचा सोहळा सुरु होता.
ग्रामस्थांकडे साखरेच्या पिशव्याच पिशव्या
मुठी-मुठीने आणि पाटीपाटीने एकमेकांना साखर वाटली जाते. परस्परांना भरविली जाते. कन्नड आणि मराठीत शुभेच्छा दिल्या जातात. रात्री अकरापर्यंत हा अनोखा साेहळा चालतो. ग्रामस्थांचे खिसे साखरेने ओथंबून जातात. साखरेने भरलेल्या पिशव्या घेऊन घराकडे परतणारे गावकरी रस्तोरस्ती दिसतात. यावर्षी सोमवारी (दि. १६) रात्री अवघ्या चार तासांत ५० किलोंच्या १७० पोती साखरेचे वाटप ग्रामस्थांनी केले.