सांगलीतील कवलापूर विमानतळासाठी राज्य शासनाची तत्त्वत: मंजुरी, उद्योगमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदिल
By अविनाश कोळी | Published: July 5, 2023 07:18 PM2023-07-05T19:18:55+5:302023-07-05T19:19:17+5:30
जमीन वर्ग करण्यात येणार
सांगली : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. विमानतळासाठी भूसंपादनाबाबतही लवकर निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
मुंबईत सामंत यांच्या उपस्थितीत कवलापूर विमानतळासंदर्भात बैठक झाली. या बैठकीसाठी खानापूरचे आमदार अनिल बाबर उपस्थित होते. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
गेली अनेक वर्षे कवलापूर येथे विमानतळ व्हावे, यासाठी सांगलीची जनता आग्रही आहे. सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीमार्फत गेल्या काही दिवसांपासून सतत पाठपुरावाही सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे, रस्ते वाहतूक महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही लोकप्रतिनिधींनी विमानतळाबाबत मागणी केली होती. मुंबईतील बैठकीत कवलापूर येथे विमानतळासाठी तत्त्वतः मंजुरी दिली असून, भूसंपादनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
बैठकीत गाडगीळ म्हणाले की, सांगलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषिपूरक उद्योगांच्या विकासासाठी कवलापूर येथे विमानतळ होणे गरजेचे आहे. सांगलीकरांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे.
जमीन वर्ग करण्यात येणार
एमआयडीसीकडील जमीन विमानतळ विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, यापुढील सर्व कारवाई विमानतळ विभागाचे अधिकारी पूर्ण करतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
निविदा निघेपर्यंत पाठपुरावा करू
कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर व पृथ्वीराज पवार म्हणाले की, शासनाने विमानतळासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. या गोष्टीचे स्वागत आहे. मात्र, आमची समिती या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत जादाची जागा हस्तांतर होत नाही व निविदा निघत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत.