जिल्हा नियोजनच्या निधीवरून वाद पेटला; सांगलीत भाजप नगरसेवकांचा महापौर दालनात ठिय्या
By शीतल पाटील | Published: June 6, 2023 05:34 PM2023-06-06T17:34:48+5:302023-06-06T17:35:01+5:30
महापौरांनी भाजपच्या नगरसेवकांची समजूत काढली. लवकरच ठराव जिल्हाधिकार्यांना देऊ, असे महापौरांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
सांगली: जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर २३ कोटींच्या विकासकामांचा ठराव महापौरांनी केला नाही. महापालिकेच्या अंतिम अर्थसंकल्पास विलंब होत असल्याने मंगळवारी संतप्त भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात ठिय्या मारत धिक्कारांच्या घोषणा दिल्या. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गटनेत्यांकडून नगरसेवकांच्या कामाची यादी घेऊन निधीचे समान वाटप केले जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले.महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून २३ कोटी ७५ लाख रूपये मंजूर झाले आहेत.
या निधीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. निधीतून पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांनीही कामे सूचविली आहेत. तर नगरसेवकांच्या वाट्याला केवळ १० लाखाचा निधी आला आहे. त्यामुळे आघाडीत नाराजीचा सूर आहे. परिणामी महापौर सूर्यवंशी यांना आघाडीच्या दबावालाही सामोरे जावे लागत आहे. भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे यांनी अनेकवेळा महापौरांकडे कामांचे ठरावाची मागणी केली. मात्र महापौरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त भाजपच्या नगरसेवकांनी महापौर दालनातच ठिय्या मारला. गटनेत्या दिगडे, स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, नगरसेवक विनायक सिंहासने, प्रकाश ढंग, अनारकली कुरणे, गीतांजली ढोपे-पाटील, सविता मदने, संजय कुलकर्णी, जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी आदी उपस्थित होते.
महापौर अनुपस्थित असल्याने त्यांना दूरध्वनी करून बोलाविण्यात आले. महापौर आल्यानंतर स्वत:च्या प्रभागात कोट्यावधी रूपयांची कामे करता, इतर नगरसेवकांना निधी देत नसल्याचा निषेध करत भाजपच्या नगरसेवकांनी धिक्काराच्या घोषणा दिल्या. महापौरांनी भाजपच्या नगरसेवकांची समजूत काढली. लवकरच ठराव जिल्हाधिकार्यांना देऊ, असे महापौरांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.