आमदार निधी खर्च करण्यात गाडगीळ, जयंत पाटीलच भारी, सर्वात कमी खर्च करणाऱ्या आमदार कोण? जाणून घ्या
By अविनाश कोळी | Published: March 1, 2023 11:55 AM2023-03-01T11:55:32+5:302023-03-01T11:56:14+5:30
खानापूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार फंडातून मंजूर कामांची संख्या कमी
अविनाश कोळी
सांगली : जिल्ह्यात आमदार फंडातून कामे करण्याबाबत सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व इस्लामपूरचे आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आघाडीवर असून, फेब्रुवारीपर्यंतच त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. खानापूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार फंडातून मंजूर कामांची संख्या कमी आहे.
आमदार फंडातील मंजूर निधी हा प्रत्येक आर्थिक वर्षात खर्च करावा लागतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आमदार फंड खर्च करण्यासाठी आता केवळ महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे आमदारांची कामे मंजूर करून ती मार्गी लावण्याची लगबग सुरू आहे. काही आमदारांनी मात्र ९० टक्के निधी खर्च केला आहे. महिन्यात उर्वरित १० टक्के निधी खर्च होऊन अतिरिक्त प्रस्ताव त्यांच्याकडून सादर होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी काही आमदारांकडून मंजूर निधीपेक्षा जास्त प्रस्ताव दिले जातात. पुढील वर्षात त्या कामांचा समावेश करून ते निधीचा विनियोग करतात. काही आमदारांना मंजूर निधी खर्च करता येत नाही. तरीही राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील बहुतांश आमदारांकडून फंडाचा विनियोग गतीने केला जात आहे. यंदा काही आमदार याबाबत मागे पडलेले दिसतात. रस्ते, गटारी, समाजमंदिरे अशा कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.
आमदार निधीतून ही कामे करता येतात
पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्यांमधील रस्ते, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा, मंडयांची दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे फंडातून करता येतात.
वर्षाला पाच कोटींचा निधी मिळतो
२०११-१२ मध्ये आमदार निधी दीड कोटींवरून दोन कोटी केला होता. त्यानंतर दहा वर्षे निधीत वाढ नव्हती. २०२०-२१ मध्ये तीन कोटी, २०२१-२२ मध्ये चार आणि आता २०२२-२३ मध्ये पाच कोटी आमदारांना मिळाले.
सर्वाधिक निधी सुधीर गाडगीळांनी खर्च केला
आठ विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक निधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी खर्च केला.
गाडगीळ यांचा फेब्रुवारीमध्येच मंजूर ४ कोटी ९० लाखांपैकी ३ कोटी ९६ लाख खर्च झाले आहेत.
मार्चअखेर संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न आहेत.
सर्वात कमी निधीचा खर्च सुमनताईंकडून
जिल्ह्यात सर्वात कमी निधी खर्च तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून झाला. त्यांनी आजपर्यंत २ कोटी २७ लाख रुपये खर्च केले आहेत.