सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, एक रुग्ण आढळला
By शीतल पाटील | Published: April 5, 2023 08:24 PM2023-04-05T20:24:30+5:302023-04-05T20:24:36+5:30
संपर्कातील बंदीची तपासणी सुरू
सांगली : येथील मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने त्याच्या संपर्कातील अन्य बंदीची तपासणी सुरू केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या बंदीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दररोज दहाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन केला होता. त्यात कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याने मोठी अडचण झाली होती. तरीही आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले होते.
सांगली शहरात कोरोनाची साथ वाढत आहे. कारागृहात नुकताच दाखल झालेल्या बंदीला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बंदीच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. सध्या तरी कोरोनाचा एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा कारागृहात ४१९ पुरूष आणि १५ महिला बंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारागृहाची क्षमता फुल्ल झाली आहे. वाढत्या संसर्गात दक्षता घेण्याची गरजेचे आहे. याबाबत कारागृह प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना तातडीने केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.