रुग्णांना औषधेच मिळेनात, वैद्यकीय कचऱ्यात मात्र औषधांचाच खच; चौकशीसाठी समिती
By अशोक डोंबाळे | Published: December 17, 2022 06:54 PM2022-12-17T18:54:53+5:302022-12-17T18:55:28+5:30
सांगली : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि दोन उपकेंद्रांना भेटी दिल्या. ...
सांगली : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि दोन उपकेंद्रांना भेटी दिल्या. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधे मिळत नाहीत, पण वैद्यकीय कचऱ्यात कालबाह्य लाखो रुपयांची औषधे पडली होती. मणेराजुरी (ता. तासगाव) आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्यामुळे डीएचओ डॉ. माने यांनाच सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करावे लागले. आरोग्य केंद्रातील सावळ्या गोंधळावर डीएचओंनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
डीएचओ डॉ. माने यांनी सीईओंच्या आदेशानुसार आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना भेटी सुरु केल्या आहेत. गुरुवारी भाेसे, खरशिंग, देशिंग, शिरढोण, मणेराजुरी, विटा येथील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना भेटी दिल्या. देशिंगमध्ये महागडी लाखो रुपयांची वैद्यकीय औषधे वैद्यकीय कचऱ्यात सापडली. याबद्दल कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करुन ही कोणतेच स्पष्ट उत्तरे ते देऊ शकले नाहीत.
मणेराजुरीत डीएचओ साडेपाच वाजता पोहोचले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नव्हते. बरोबर याचवेळी एक सर्पदंश झालेला रुग्ण आले होते. या रुग्णास डीचओंनीच तत्काळ उपचार करुन दिलासा दिला. तरीही तासभर वैद्यकीय अधिकारी आलेच नाहीत. यावर डीएचओही वैद्यकीय अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले होते. येथील तीन कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
विटा आरोग्य केंद्रातील बंद रुग्णवाहिका चालू
विटा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका बंद असल्याचे डीएचओ डॉ. माने यांच्या निदर्शनास आले. शुक्रवारी लगेच रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी लगेच ४६ हजार रुपयांचा खर्च मंजूर करुन रुग्णवाहिका चालू करण्याचे आदेशही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
देशिंगच्या कालबाह्य औषधाच्या चौकशीसाठी समिती
देशिंग येथील वैद्यकीय कचऱ्यात कालबाह्य महागडी लाखो रुपयांची औषधे डीएचओ डॉ. माने यांना भेटीत सापडली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पलूसचे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य कर्मचारी अशा तिघांची समिती नेमली आहे. समितीच्या अहवालावर पुढील कारवाई होणार आहे.
तीन वैद्यकीय अधिकारी, तीन कर्मचाऱ्यांना नोटिसा
मणेराजुरी, देशिंग, भोसे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि मणेराजुरी येथील तीन कर्मचारीही गैरहजर होते. या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी कारवाईची नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांना दिल्या आहेत. नोटिसांना खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारभार सुधारावा, अन्यथा...: जितेंद्र डुडी
वैद्यकीय अधिकाऱ्यांना बहुतांशी मूलभूत सुविधा देण्यावर माझा भर आहे. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कारभारात सुधारणाच करायच्या नाही असे ठरविले तर माझ्याकडे ही कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मीच भेटी देण्याच्या सूचना दिल्या असून सर्व अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
खरशिंग, शिरढोण मध्ये चांगली कामगिरी
कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग, शिरढोण आरोग्य उपकेंद्रात चांगल्या सुविधा डीएचओंना दिसून आल्या. आरोग्य सेविका ही तेथे मुक्कामास होत्या. येथील चांगल्या कामगिरीबद्दल तेथील कर्मचाऱ्यांचे डीएचओंनी कौतुक ही केले.