सांगलीमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची झुंबड, रस्त्यांवर रांगा
By अविनाश कोळी | Published: January 1, 2024 08:38 PM2024-01-01T20:38:59+5:302024-01-01T20:39:59+5:30
शहरभर गोंधळ : दर उतरण्याच्या अफवेचीही भर
सांगली : एकीकडे इंधन टँकरचालकांनी संप पुकारल्यामुळे दिवसभर इंधनाची वाहतूक ठप्प झाली असताना पेट्रोल व डिझेलचे दर उतरण्याच्या अफवेने सांगलीत गोंधळ उडाला. शहरभर प्रत्येक पेट्रोलपंपावर लांबच्या लांब रांगा लागल्याने त्यांना आवरणे कठीण झाले. रात्री उशिरापर्यंत शहरातील पेट्रोलपंपावर गर्दी होती.
पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी सांगलीत सोमवारी सायंकाळी वाहनधारकांची एकच झुंबड उडाली. पंपापासून रस्त्यापर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. इंधन टँकरचालकांच्या बंदमुळे तसेच पेट्रोल पंपही बंद होण्याच्या चर्चेने हा गोंधळ निर्माण झाला. इंधनाचे दर उतरणार असल्याची अफवाही काहींनी पसरविली. त्यामुळे वाहनधारकांनी पंपांवर गर्दी केली. शहरातील बहुतांश पंपावर गर्दी झाली. काही पंपावरील इंधनही संपले.
नागरिक जागृती मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी याबाबत जिल्हा प्रशासनावर टीका केली. इतका गोंधळ निर्माण झाला असताना जिल्हा प्रशासन गप्प कसे बसते, वाहनधारकांचे होणारे हाल तसेच अचानक इंधनाअभावी निर्माण होणारी परिस्थिती याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घातले नाही, तर नागरिकांसमवेत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा साखळकर यांनी दिला.