बुडव्या व्यापाऱ्यांवरून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनमध्ये धुसफुस, अडत्यांनी स्थापन केली वेगळी संघटना
By अशोक डोंबाळे | Published: August 30, 2022 11:49 AM2022-08-30T11:49:17+5:302022-08-30T12:09:41+5:30
सांगली : सौद्यातून बेदाणा घेऊन गेल्यानंतर व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्यामुळे सांगली -तासगाव बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली ...
सांगली : सौद्यातून बेदाणा घेऊन गेल्यानंतर व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. अडत्यांच्या प्रश्नाकडे असोसिएशनचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करून ४० अडत्यांनी वेगळी चूल मांडत सांगली बेदाणा अडत संघटनेची स्थापना केली आहे.
बेदाणा सौदे आणि द्राक्ष खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. देशभरातून व्यापारी बेदाणा सौद्यात येऊन विश्वासार्हता निर्माण करून बेदाणा खरेदी करून निघून जातात. ते पुन्हा सांगलीकडे फिरकतच नाहीत. अडत्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ४० दिवसात मिळणारे पैसे सध्या ७० ते ८० दिवसातही मिळत नाहीत. व्यापाऱ्यांनी पैसे थकविले म्हणून अडत्यांना शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवून चालत नाही. यातून अडत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांकडील कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम हेच बेदाणा असोसिएशनच्या संघर्षाला कारण आहे.
वेगळा संसार फार काळ टिकणार नाही : राजेंद्र कुंभार
बेदाणा असोसिएशन व्यापारी, अडत्यांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. असोसिएशन म्हणजे वसुली अधिकारी नाही. व्यापारी आणि अडत्यांनी एकमेकांच्या विश्वासावरच व्यवहार केला पाहिजे. असोसिएशनने व्यापाऱ्यांकडील थकीत पैसे वसूल करून दिले आहेत, असे मत सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले. वेगळा संसार फार काळ टिकत नाही, पुन्हा ते आमच्याकडेच येणार आहेत, असेही ते म्हणाले.
असोसिएशनचे संचालक मंडळच बेकायदेशीर
सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनची मान्यता २०१८ पासून रद्द झाली आहे. तरीही संचालक मंडळाची निवडणूक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन संचालक मंडळ तयार केले आहे. या संचालक मंडळाला काहीही अधिकार नाही, असा आरोप बेदाणा असोसिएशनच्या काही सभासदांचा आहे.
असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न आठवड्यात सुटणार
सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न काही कागदपत्रांमुळे निर्माण झाला आहे. याबद्दल न्यायालयात सुनावणी सुरू असून आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. येत्या आठवड्यात असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.
अडत्यांच्या हक्कासाठी संघटना काढली : प्रशांत पाटील-मजलेकर
सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनचे आम्ही सभासद आहोतच, पण अडत्यांचे बेदाणा सौद्यातील पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे ४० जणांची सांगली अडत बेदाणा संघटना स्थापन केली आहे. या माध्यमातून अडत्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. अडत्यांच्या हक्कासाठी ही संघटना काम करणार आहे, असे मत अडत संघटनेचे प्रशांत पाटील-मजलेकर यांनी व्यक्त केले.