सांगलीत महिलेवर हल्ला करून दागिने पळविले
By शीतल पाटील | Published: February 27, 2023 10:14 PM2023-02-27T22:14:36+5:302023-02-27T22:15:12+5:30
महिला जखमी : ६० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : येथील उत्तर शिवाजीनगर परिसरातील ईगल पाईप कारखान्याजवळ एका महिलेला खाली पाडून तिला जखमी करीत ६० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमनव्वा मल्लाप्पा केंचनवर (वय ३८, सध्या रा. उत्तर शिवाजी नगर, सांगली, मुळ जाममट्टी, ता. येळगी, जि. बागलकोट) असे जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यमनव्वा केंचनवर या उत्तर शिवाजीनगरमधील ईगल पाईप कारखान्याजवळ राहतात. त्या मजुरी करतात. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता त्या घरासमोर उभ्या होत्या. यावेळी एक अज्ञात इसम तिथे आला. तो त्यांच्याशी बोलू लागला. काही वेळात त्याने यमनव्वा यांना धक्का मारून खाली पाडले. त्यांच्या गळ्याला हात घालून १५ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व टाॅपवेल हिसडा मारून तोडले. त्यांना बेशुद्ध करून चोरट्याने पलायन केले.
जखमी यमनव्वा यांना शेजारील शेटव्वा व्हसमणी व माया गुरव यांनी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना भारती हाॅस्पीटलला हलविण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"