सांगलीत बंद बंगला फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास, घरफोडीचे सत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:25 PM2022-12-26T20:25:03+5:302022-12-26T20:27:17+5:30
बायपास रस्त्यावरील दरोड्यानंतरही घरफोडीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शीतल पाटील
सांगली - सांगली हायस्कूल रस्त्यावरील शिवसाईनगरमध्ये बंद बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. बायपास रस्त्यावरील दरोड्यानंतरही घरफोडीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी रामबीर जयराम सांगवान (वय ५६) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामबीर सांगवान यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सांगली हायस्कूल परिसरातील शिवसाई नगर परिसरात त्यांचा सौरभ नावाचा बंगला आहे. घरातील लग्नकार्यासाठी १९ डिसेंबर रोजी ते कुटुंबासह परगावी गेले होते. सकाळी साडेअकरा वाजता ते कुटुंबासह निघाले. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांच्या बंगल्याचा कडीकोयंडा उचकटलेल्या अवस्थेत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीने सांगवान यांना माहिती दिली. ते कुटुंबासह परत आल्यानंतर चोरीची घटना समोर आली. त्यानंतर शहर पोलिसांना कळविण्यात आले.
दरम्यान, चोरट्यांनी घरातील अडीच तोळ्याची ८० हजार रुपयांची सोन्याची चेन, सात ग्रॅमची २५ हजारांची अंगठी, सहा ग्रॅमच्या बाळी, पाच हजारांचे पैजण, वीस हजारांची चांदी आणि ३२ हजारांची रोकड असा एक लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घराचा कडीकोयंडा उचकटून ही चोरी करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भरवस्तीत ही चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.