उज्वल निकम पुन्हा विशेष सरकारी वकील; सांगलीतील खटल्यासह राज्यातील खटल्यात हजर राहणार
By घनशाम नवाथे | Published: June 15, 2024 05:18 PM2024-06-15T17:18:15+5:302024-06-15T17:23:55+5:30
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिलेले ॲड. उज्वल निकम पुन्हा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झाले आहेत.
घनशाम नवाथे, सांगली : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिलेले ॲड. उज्वल निकम पुन्हा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झाले आहेत. राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध जिल्ह्यातील २९ प्रकरणात ते पुन्हा काम पाहतील. सांगलीतील अनिकेत कोथळे खून खटल्याचा यामध्ये समावेश आहे.
ॲड. उज्वल निकम हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा राज्य विधी व न्याय विभागाकडे दिला होता. हा राजीनामा स्विकारण्यात आला होता. त्यामुळे राज्यभरात ॲड. निकम यांच्याकडे असलेल्या २९ प्रलंबित खटल्यांमध्ये सरकारतर्फे कोणाची नियुक्ती होणार? याकडे लक्ष लागले होते.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या निकालात ॲड. निकम यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे ॲड. निकम हे पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्याकडील खटल्यांमध्ये हजर राहणार काय? याबाबत गेले काही दिवस उत्सुकता लागली होती. अखेर राज्य सरकारने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार ॲड. निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. कायदा आणि न्याय विभागाने याबाबत १० जून रोजी सूचना जारी केली आहे. तसेच ज्या जिल्ह्यातील खटल्यात ॲड. निकम पूर्वी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत होते, त्या जिल्ह्यातील न्यायालयास याबाबत कळवले आहे. सांगलीतील न्यायालयात दि. १३ रोजी याबाबतची सूचना प्राप्त झाली आहे.
सांगलीतील खटला अंतिम टप्प्यात-
सांगली शहर पोलीस ठाण्यात अनिकेत कोथळे याचा मारहाण करून खून करून पुरावा नष्ट केल्याबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. सीआयडीने याचा तपास केला आहे. हा खटला सध्या अंतिम टप्प्यात आहे. ॲड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे. त्यामुळे खटल्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.