शैक्षणिक गुणवत्तेत सांगलीची भरारी, दहाव्यावरून चौथ्या स्थानावर झेप
By अशोक डोंबाळे | Published: January 31, 2023 06:05 PM2023-01-31T18:05:25+5:302023-01-31T18:05:57+5:30
जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मॉडेल स्कूलसह अनेक उपक्रम राबविले
अशोक डोंबाळे
सांगली : पहिली ते आठवीच्या भाषा व गणितात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रगती ४ ते ८ टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत जिल्हा २०१८ मध्ये दहाव्या स्थानी होता, तो २०२२ मध्ये चौथ्या स्थानावर आला आहे. ‘असर’ने २०१८ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल जाहीर केला आहे.
दि. १८ जानेवारीरोजी ‘असर’ सर्वेक्षण जाहीर झाले आहे. कोरोना काळात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मॉडेल स्कूलसह अनेक उपक्रम राबविले. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा वाढविल्यामुळे गुणवत्तेत वाढ झाली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषा, गणित व इंग्रजीच्या मूलभूत क्षमता प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक परिस्थितीद्वारे अनुभवातून शिक्षण, यावर विशेष कार्य जिल्हा परिषद प्रशासनाने केले. अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचेही विशेष लक्ष आहे.
शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ०.४ टक्के घटले
अंगणवाडी व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. शिक्षक व शाळा यांचा सकारात्मक प्रतिसाद व शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय दिसत आहे. पालक खासगी शाळांकडून पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळताना दिसत आहेत. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण हे २०१८ च्या तुलनेत ०.८ वरून ०.४ झाले आहे.
जिल्ह्यातील ४०.७ टक्के मुले कच्ची
जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या गुणवत्तेचा विचार केल्यास पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग तर तिसऱ्या स्थानावर रत्नागिरी जिल्हा आहे. सांगली जिल्हा दहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. पण, आजही जिल्हा परिषद शाळेतील ४०.७ टक्के मुले भाषा, गणितात कच्ची आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता
जिल्हा - टक्केवारी
कोल्हापूर - ७१.१
सिंधुदुर्ग - ६७.७
रत्नागिरी - ६७.६
सांगली - ५९.३
पुणे - ५७.८