‘नीट’च्या गोंधळात पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाची घाई, विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर
By अविनाश कोळी | Published: June 26, 2024 01:39 PM2024-06-26T13:39:50+5:302024-06-26T13:40:19+5:30
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
अविनाश कोळी
सांगली : नीट परीक्षेच्या निकालाचा गोंधळ सुरू असतानाच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मंगळवारी पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असून, नाराजीही व्यक्त केली जात आहे.
देशातील १ हजार ३६५ विद्यार्थ्यांची नीट परीक्षा पुन्हा झाली आहे. त्यामुळे रँकमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश नीटच्या मार्कावरच होतात. सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरू आहे. परीक्षा पुन्हा होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशा गोंधळातच पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना २५ जून ते ७ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. १९ जुलै रोजी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जाहीर होईल. विभागीय कोट्यासाठी ३१ जुलै रोजी अर्ज भरता येईल. १ ऑगस्ट रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर होईल. त्याचप्रमाणे विभागीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीसाठी १७ ऑगस्ट रोजी प्रेफरन्स फॉर्म भरता येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होईल.
राज्य पातळीवरील कोट्यासाठी २३ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी प्रेफरन्स फॉर्म भरता येणार असून, २६ ऑगस्ट रोजी पहिली यादी जाहीर होईल. राज्य पातळीवरील दुसऱ्या फेरीसाठीचा प्रेफरन्स फॉर्म ५ सप्टेंबरला भरता येईल, तर ६ सप्टेंबर रोजी दुसरी निवड यादी जाहीर होईल. विभागीय आणि राज्य पातळीवरील कोट्यासाठीच्या तिसरी फेरीसाठी १३ सप्टेंबर रोजी प्रेफरन्स फॉर्म भरण्याची मुदत असून, १५ सप्टेंबर रोजी त्याची निवड यादी घोषित होईल.
पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. राज्यात पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नागपूर, मुंबई, शिरवळ, परभणी आणि उदगीर अशी पाच सरकारी महाविद्यालये असून, या महाविद्यालयातून ३८४ जागा उपलब्ध आहेत. यापैकी १५ टक्के जागा या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. महाराष्ट्रात एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही. गेल्या कित्येक वर्षांत एकही नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय राज्यात सुरू झालेले नाही. यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयातून खूपच कमी जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
देशभरात नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात गोंधळाचे वातावरण असून, नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही, याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे. सर्वोच्च न्यायालयात ८ जुलै रोजी याची सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. असे असताना घाईघाईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे कारण नव्हते. ८ जुलैपर्यंत वाट पाहता आली असती. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली