Sangli: जत तालुक्याच्या पूर्व भागात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल, सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 01:34 PM2023-12-18T13:34:06+5:302023-12-18T13:34:24+5:30
उमदी : मायथळ येथून कॅनाॅलद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ...
उमदी : मायथळ येथून कॅनाॅलद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची विस्तारित कामे लवकरच कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करतील. लोकांची पाण्याची मागणी आहे. पाणी मिळाले पाहिजे ही आमची देखील भावना आहे. जरी प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी देखील माडग्याळ येथील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल होत आहे. पंतप्रधान कृषी योजनेतून २१०० कोटी दिल्याने बंदिस्त पाइपमधून पाणी आले.
विलासराव जगताप म्हणाले, म्हैसाळच्या मूळ योजनेकडे दुर्लक्ष नको. विस्तारित म्हैसाळ योजनेला प्राधान्य द्या. म्हैसाळ योजनेतून ६५ गावांना पाणी मिळावे. ९०० कोटी असलेली विस्तारित योजना होणे गरजेचे आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, तालुक्यातील सर्व जमिनी ओलिताखाली याव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. अधिवेशनात मी जत तालुक्यातील प्रश्न मांडले. दुष्काळी तालुक्यात जी सवलत मिळायला पाहिजे होते ती मिळाली नाही.
आमदार पडळकर म्हणाले, विस्तारित योजनेसाठी आम्ही सगळे जण प्रयत्न करू. दुष्काळ संपला पाहिजे, अशी भावना असणे चालत नाही त्यासाठी काम करावे लागते. यावेळी प्रकाशराव जमदाडे, तम्मनगौडा रवी पाटील, मन्सूर खतीब, तुकाराम बाबा, सचिन निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रवींद्र आरळी, सरदार पाटील, सुनील पवार, सुरेश शिंदे, प्रमोद सावंत, अण्णा भिसे, भुपेत्र कांबळे, सरपंच सौ. अनिता माळी, सरपंच मुत्तू तेली, उपसरपंच सौ. सविता सावंत, सोमन्ना हाके, लिंबाजी माळी, सोमनिंग बोरामणी, महादेव अंकलगी सह मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल निकम यांनी, तर सूत्रसंचालन सचिन निकम यांनी केले.
जगताप यांनी थांबावे
विलासराव जगताप हे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. तसेच, वस्तादों के वस्ताद जगताप साहेब असं कौतुक करत त्यांनी आता थांबावे, असा टोला खासदार पाटील यांनी दिला.
शुक्राचार्यांमुळे विलंब
२०२० लाच म्हैसाळचे पाणी जत पूर्व भागात आले असते. मात्र, तालुक्यातील शुक्राचार्यांमुळे एवढा कालावधी लागला, असा टोला जमदाडे यांनी स्थानिक नेत्यांना दिला.