Sangli: शेतात, घरी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही; विट्यात ‘फेसबुक लाइव्ह’ करत दाम्पत्याने केले विषप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:32 PM2023-08-01T12:32:55+5:302023-08-01T12:34:01+5:30
‘आई, आप्पा, मला माफ करा. रस्त्याचा व जमिनीचा नाद सोडा, नको ती जमीन आपल्याला.
विटा : शेतात व घरी जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने पती-पत्नीने ‘फेसबुक लाइव्ह’ करीत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील फुलेनगरमध्ये सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रशांत प्रल्हाद कांबळे व स्वाती प्रशांत कांबळे असे दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांवर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशांत कांबळे आई-वडील, पत्नी व मुलांसह फुलेनगर येथे राहतात. त्यांच्या घराकडे व शेतात जाण्यासाठी दहा फुटाचा रस्ता आहे. हा रस्ता पुढील बाजूस पत्र्याचे शेड मारून दुसऱ्या एका कुटुंबाने बंद केल्याने कुटुंबीयांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे कांबळे यांनी तहसीलदारांकडे रस्ता मागणीसाठी दावा दाखल केला. तहसीलदार उदय गायकवाड यांनी २५ मे २०२३ रोजी पहिला निकाल देताना कांबळे कुटुंबासाठी रस्ता खुला करून देण्याची ताकीद संबंधितांना दिली. परंतु, निकालाची प्रत कांबळे यांना दिली नाही.
त्यानंतर तहसीलदार गायकवाड यांनी दि. १८ जुलै रोजी दुसरा निकाल देत कांबळे यांचा दावा फेटाळून लावला. रस्ता देता येत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे कांबळे व्यथित झाले होते. सोमवारी सकाळी त्यांनी ‘फेसबुक लाइव्ह’ करीत रस्त्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यासाठी झालेल्या अन्यायाची माहिती दिली. तहसीलदार गायकवाड यांच्यासह स्थानिक राजकारण्यांवर गंभीर आरोप केले.
राजकीय दबावापोटी निकाल बदलून अन्याय केला. अपील करूनही पुढे न्याय मिळणार नसल्याचे सांगत प्रशांत व स्वाती यांनी भातामध्ये विष टाकून तो खाऊन आत्महत्या करत असल्याचे फेसबुकवरून सांगितले. याची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
मला माफ करा...
प्रशांत कांबळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. ‘आई, आप्पा, मला माफ करा. रस्त्याचा व जमिनीचा नाद सोडा, नको ती जमीन आपल्याला. तुम्ही ज्ञानेशला घेऊन मामाकडे जा. तिथेच राहा. राजकारणी तुम्हाला जगू देणार नाहीत. आम्ही जीवन संपवत आहोत. त्यासाठी समीर कदम, विठ्ठल कांबळे, सुनील कांबळे, अनिल कांबळे, किशोर कांबळे, त्याची पत्नी पूनम कांबळे, विक्रांत कांबळे आणि तहसीलदार उदयसिंह गायकवाड जबाबदार आहेत,’ असे चिठ्ठीत नमूद केले आहे.
तहसीलदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रशांत कांबळे घरासाठी रस्ता मागत होते. रस्ता देणे हा तहसीलदारांच्या अखत्यारितील विषय नव्हता. याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता.