'जी-२०'त मिरजेतील तंतुवाद्यांची तार झंकारणार, तंतुवाद्य निर्मात्यांना राज्याच्या उद्योग विभागाचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:18 PM2022-12-12T14:18:44+5:302022-12-12T14:36:40+5:30
चालू वर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला
सदानंद औंधे
मिरज : मुंबईत होणाऱ्या जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या कलावैभवाची ओळख करून देण्यासाठी हस्तकला प्रदर्शनाबरोबरच मिरजेतील तंतुवाद्यांचेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या उद्योग सहसंचालकांनी मिरज म्युझिकल क्लस्टरला निमंत्रित केले आहे.
चालू वर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला असून या परिषदेत विविध देशातील सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने परिषदेची पहिली बैठक मंगळवारी दि. १३ ते १६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स व सांताक्रूज येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या निमंत्रितांना महाराष्ट्राच्या कलावैभवाची ओळख घडविण्यासाठी या ठिकाणी हस्तकलेचे स्टॉल लावण्यात येणार असून मिरजेत तंतुवाद्य कारागिरांसाठीही येथे स्टॉल उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांची संस्था असलेल्या मिरज म्युझिकल क्लस्टरला राज्याच्या उद्योग विभागाने निमंत्रण दिले आहे.
परिषदेत सहभासाठी तंतुवाद्यांचा क्यूआर कोड तयार करून संबंधित वाद्यांची माहिती, दर्जा व इतर तपशील दर्शविण्यात येणार आहे. आकर्षक सजावट केलेल्या स्टाॅलवर तंतुवाद्य प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. परदेशातून आलेल्या निमंत्रितांना तंतुवाद्यांची इंग्रजीतून माहिती देण्यासाठी सफाईदार इंग्रजी बोलणारा माहीतगार स्टॉलवर ठेवण्याच्या सूचना उद्योग सहसंचालकांनी दिल्या आहेत. मिरज म्युझिकल क्लस्टरचे मोहसीन मिरजकर व अल्ताफ पिरजादे परिषदेच्या पहिल्या बैठकीतील तंतुवाद्य प्रदर्शनासाठी मुंबईला गेले आहेत.
‘तंतुवाद्याचे माहेरघर’ अशी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीच्या कलेचे प्रदर्शन जी-२० परिषदेत होणार आहे. यामुळे मिरजेच्या लौकिकात भर पडणार आहे. मिरज शहर तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभरात ख्यातनाम आहे. तंतुवाद्यनिर्मिती व्यवसायास सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना जगभरात मागणी आहे. विविध देशातील संगीतप्रेमींना भारतीय वाद्यांविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. देशातील अनेक दिग्गज गायक-वादक मिरजेत तयार झालेली वाद्ये वापरतात.
मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीचा बहुमान
मिरजेतील तंतुवाद्य निर्माते मजीद सतामेकर यांना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला असून आता मिरजेतील तंतुवाद्यांना आंतर राष्ट्रीय परिषदेत स्थान मिळाल्याने मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रासाठी बहुमानाची गोष्ट आहे.