पतीच्या खून खटल्यात पत्नीच झाली फितूर, महिलेवर कारवाईचे जिल्हा न्यायालयाचे आदेश
By शरद जाधव | Published: March 9, 2023 09:02 PM2023-03-09T21:02:28+5:302023-03-09T21:02:37+5:30
थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे पतीच्या खूनप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्यात फिर्यादी पत्नीच फितूर झाल्याचा प्रकार घडला.
सांगली : थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे पतीच्या खूनप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्यात फिर्यादी पत्नीच फितूर झाल्याचा प्रकार घडला. न्यायालयाने याची दखल घेत तिच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. सुवर्णा भरत खोत (वय २५, रा. थबडेवाडी) असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० ऑगस्ट २०२१ रोजी थबडेवाडी सुवर्णा खोत हिचा पती भरत ज्ञानदेव खोत यांचा गावातीलच दोघांनी घरासमोर खाली पाडून धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यावर वार करून खून केला होता. मृत भरत खोत याचे गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांनी हा खून केला होता.
या खून प्रकरणातील मुख्य आरोपीकडून बऱ्याचवेळा प्रयत्न करूनही जामीन झाला नव्हता. यातील एक आरोपी जेलमध्ये आहे अशी वस्तूस्थिती असताना व खटल्याची सुनावणीही अंतिम टप्प्यात असताना सुवर्णा खोत हिने न्यायालयात शपथेवर जबाब दिला. मूळ फिर्यादी, वर्दीदार फितूर होऊन आरोपी पक्षासोबत संगनमत करून देण्यात आला होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार काम पाहत आहेत. त्यांनी कौशल्यपूर्ण उलट तपास घेतला.
उलट तपासात ‘माझ्या पतीचा खून झाला आहे, खून झालेला मी पाहिला आहे, आरोपी सोडून गावातील कोणाशीही त्यांचे भांडण, वाद नव्हते, फिर्याद मी सांगितली ती बरोबर व फिर्याद मी स्वइच्छेने दिली असून, कोणीही दबाव आणला नाही असे उलट तपासात मान्य केले. यावरून फिर्यादी सुवर्णा खोत हिने खोटी साक्ष दिल्याचे शाबित झाले.यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी कारवाइचे आदेश देण्यात आले.
फितूर साक्षीदारांची गय करू नये
युक्तिवाद करताना जमादार म्हणाले की, फिर्याद दाखल केल्यानंतर तपास कामासाठी पोलिस यंत्रणा त्यानंतर न्यायासाठी सरकारी वकील व न्यायालयीन कामकाजाची यंत्रणेचा सर्व खर्च सरकार करते. अशा फितूर साक्षीमुळे आरोपीला शिक्षा हाेऊ शकत नाही. तसेच खरेखुरे ज्ञानदार होऊ शकत नाही. त्यामुळे फितूर साक्षीदारांची गय करू नये.