गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: गावाचा अनियंत्रित विस्तार, गायरानात अतिक्रमणे फार
By संतोष भिसे | Updated: December 14, 2024 18:07 IST2024-12-14T18:07:08+5:302024-12-14T18:07:34+5:30
ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज

गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: गावाचा अनियंत्रित विस्तार, गायरानात अतिक्रमणे फार
संतोष भिसे
सांगली : गेल्या काही वर्षांत मोठ्या गावांचे नागरिकीकरण वेगाने होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठी गावे वेगाने विकसित होत आहेत. या तुलनेत तेथे नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायती सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या पाच-सात पटींनी वाढली तरी गावठाण मात्र वाढले नाही. परिणामी लोकांनी अतिक्रमणे करत गायरानात अतिक्रमणे व मनमानी वस्त्या केल्या आहेत.
गावकुसाबाहेर वसाहती वाढल्या, शेकडो घरे वाढली; पण तेथे रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी सुविधा देण्यात ग्रामपंचायतींची ताकद अपुरी पडत आहे. विशेषत: शहरांलगतच्या गावांत ही समस्या गंभीर आहे. शहर जवळ असल्याने ही गावे वेगाने वाढली. शहराबाहेर शांत वातावरणात राहू इच्छिणाऱ्यांनी या गावांत जागा घेऊन बंगले उभारले. शहरातील धनिकांनी गुंतवणूक म्हणून शेजारच्या या गावांत जमिनी खरेदी करून ठेवल्या. पण या ग्रामपंचायतींना ‘नगरविकास कशाशी खातात?’ हेच माहिती नाही.
अजगरासारख्या वाढणाऱ्या वसाहतींना नियंत्रित करण्याचा अजेंडा ग्रामविकास किंवा नगरविकास विभागाकडे नाही. विस्तारित वसाहतीतील रहिवासी सुविधांसाठी ग्रामपंचायतींशी वर्षानुवर्षे माथेफोड करीत आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदी प्राथमिक सुविधांसाठी त्यांचा दररोजच संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे २०० ग्रामपंचायतींची लोकसंख्या १५ हजार ते २० हजारांदरम्यान आहे. त्या नगर पंचायत होण्यास पात्र आहेत. काही वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी आदी तालुका शहरे असलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती झाल्या. पण, त्यांच्या इतकीच मोठ्या लोकसंख्येची गावे मात्र ग्रामपंचायतीच राहिली आहेत.
मालगावात सर्वात जास्त लोकसंख्या, तरीही..
मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. गावठाणासह वाड्या-वस्त्या आणि सुभाषनगरच्या काही भागाचा बोजा ग्रामपंचायतीवर आहे. एखाद्या नगरपालिकेइतका बोजा ग्रामपंचायतीवर आहे. पण, तिचे रूपांतर नगर पंचायतीत होण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर उदासीनता आहे. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच विभाजनाचा निर्णय घेतला आहे. सुभाषनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करून ताण कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे.
वाळवा तालुक्याचे ठिकाणी, तरीही ग्रामपंचायत
तालुक्याचे ठिकाण असलेले वाळवा गाव व्यापारी केंद्र आहे. शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करताना लोकसंख्येतही वाढ होत आहे. पंचक्रोशीतील डझनभर गावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण गावावर आहे. तरीही गावगाडा हाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवरच आहे. येथे नगर पंचायत करण्यात कोणालाही स्वारस्य नसावे अशी स्थिती आहे.