लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:47 PM2023-10-04T17:47:24+5:302023-10-04T17:48:39+5:30
विस्तारित योजनेवरून आरोप-प्रत्यारोप रंगणार
विठ्ठल ऐनापुरे
जत : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेत राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. ज्वलंत प्रश्नांना त्यानिमित्ताने फुंकर घातली जाणार आहे. जत तालुक्याचा विचार केला तर वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने उफाळणार आहे. राजकीय रणांगणात पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट म्हैसाळच्या विस्तारित योजनेवर ठाम आहे. दोन्हीपैकी कोणत्याही योजनेचे काम सुरू नाही. विस्तारित योजनेवर मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कामास सुरुवात नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाण्याचाच मुद्दा चर्चेत येणार आहे.
निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतोच. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव याठिकाणच्या लोकांना येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनासाठीची पक्षीय चढाओढ दिसून येईल. तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करतात. पाणी आल्यास त्याचे श्रेय जाहीरपणे घेतले जाते; परंतु वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणीच घेत नाही.
पाण्यात मुरतेय राजकारण
पाण्यातच खरे राजकारण मुरतेय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा तालुक्यातील या म्हैसाळ विस्तारित प्रमुख उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाभोवतीच फिरणार असून, शेतकरीच याबाबत उमेदवारांना, सामान्य लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, अशी परिस्थिती आहे.
पाण्याचे नियोजन कुठे आहे ?
सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त ५o टक्केच पाऊस झाला आहे. मोठा पाऊस न झाल्यास शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कालव्याला आलेले पाणी मिळण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली होती. पाणी येत असले तरी ते नियोजनाप्रमाणे येत नसून ते नेहमीच कमी दाबाने मिळते. त्यामुळे हा राजकीय डावपेच तर नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
श्रेयवादाची किनार
म्हैसाळ पाण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी अधिकारी तसेच मंत्र्यांसोबत कशा बैठका घेतल्या, तसेच पाण्याच्या पूजनाबाबत सध्या तालुक्यात पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसा पाण्याबाबतचा श्रेयवाद उफाळून येणार आहे.