सांगलीत ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनींना कपडे काढून उलटे घालायला लावले; पालकांकडून संताप
By अविनाश कोळी | Published: May 10, 2023 04:36 PM2023-05-10T16:36:18+5:302023-05-10T16:48:31+5:30
एकाच केंद्रात वेगळा नियम का
सांगली : राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)द्वारे घेतल्या गेलेल्या ‘नीट’ परीक्षेसाठी सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना कपडे काढायला लावून ते उलटे घालायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी एनटीएकडे तक्रारी केल्या आहेत.
वैद्यकीय प्रवेशाकरिता नीट (नॅशनल एलिजिबल कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षा ७ मे रोजी देशभरात पार पडली. सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना तपासणीच्या नावाखाली कपडे काढायला लावले. त्यानंतर ते उलटे परिधान करायला लावले. संपूर्ण परीक्षा त्यांना उलट्या कपड्यानिशी द्यायला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भाग पाडले. इतकेच नाही तर या विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रेही उलटे परिधान करायला सांगितले. परीक्षा देणे महत्त्वाचे असल्याने विद्यार्थिनींनी उलटे कपडे घालून परीक्षा दिली.
पालक संतप्त
परीक्षा झाल्यानंतर जेव्हा मुले बाहेर आली तेव्हा पालकांनी उलटे कपडे घातल्याबद्दल विचारणा केली. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकार सांगितल्यानंतर पालक हादरले. पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला. तीन तास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उलटे कपडे घालून परीक्षा देत होते. सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकार करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
एकाच केंद्रात वेगळा नियम का
अन्य केंद्रांत कुठेही असा प्रकार आढळला नाही. प्रत्येक ठिकाणी केवळ एनटीएच्या सूचनेप्रमाणे ड्रेस कोड आहे की नाही, इतकीच तपासणी केली. एकाच केंद्रात वेगळा नियम का लावला गेला, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कस्तुरबा वालचंद महाविद्यालयाने या परीक्षेशी कॉलेजचा काहीच संबंध नसल्याचं तसेच फक्त वर्ग उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले.
परीक्षा संस्थेकडे तक्रारी
संतापलेल्या पालकांनी थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. ई-मेलद्वारे त्यांनी या तक्रारी दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था याबाबत काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनटीए म्हणते हा प्रकार चुकीचा
राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी ‘लोकमत’ने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नीट परीक्षेसाठी कपडे उलटे घालण्याबाबत कोणतेही निर्देश आम्ही दिले नव्हते. ड्रेस कोड व काही नियमांबाबत सूचना केली होती. त्यामुळे कपडे उलटे घालायला लावण्याचा प्रकार कुठे घडला असेल तर तो चुकीचा आहे. याबाबत अद्याप तक्रार आली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेे.
शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने बुधवारी याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे, आकाश माने, सनत पाटील यांनी दिला.