निवडणुकीच्या धामधुमीत सांगली जिल्ह्यात आर्थिक उलाढाल वाढली, विक्रमी जीएसटी संकलन
By अविनाश कोळी | Published: May 6, 2024 01:42 PM2024-05-06T13:42:07+5:302024-05-06T13:42:35+5:30
देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला
सांगली : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात विक्रमी १७७ कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत यंदा ३५ टक्के करसंकलन अधिक आहे.
मागील आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातून एकूण १ हजार २४३ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता. आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. एप्रिल २०२४ मध्ये १७७ कोटींचे संकलन हे जीएसटी अंमलबजावणीनंतरचे एका महिन्यातील सर्वाधिक संकलन ठरले आहे.
एप्रिल २०२३ मध्ये एकूण १३१ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. यंदा त्यात ४६ कोटींची म्हणजेच ३५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. एप्रिलअखेरपर्यंत निवडणुकांची धामधुम सुरुच होती. या काळात आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे १७७ कोटींची विक्रमी मजल जीएसटी विभागाला मारता आली.
देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशाचा विचार करताना एप्रिल २०२४मध्ये जीएसटीचा एकूण महसूल १ लाख १० हजार २६७ कोटी आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये १ कोटी ८७ लाख ३५ कोटीचा महसूल जमा होता. यंदा १२ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करताना यंदाच्या एप्रिलमध्ये ३७ हजार ६७१ कोटी जीएसटी जमा झाला. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये ३३ हजार १९६ कोटी जमा झाले होते. यंदा १३ टक्के वाढ झाली आहे.