शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकले, सांगलीतील १५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:53 PM2023-01-05T15:53:31+5:302023-01-05T15:54:04+5:30
जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले
सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीपरीक्षा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा पाचवीचा २८.१५ तर आठवीचा १६.९७ टक्के निकाल लागला.
पाचवीचे १२ आणि आठवीचे ९ असे मिळून २१ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ग्रामीण भागातील तब्बल १५ विद्यार्थी राज्य यादीत चमकले.
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेसाठी १८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १७ हजार २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाचवीचा निकाल २८.१५ टक्के लागला असून, राज्याच्या गुणवत्ता यादीत १२ विद्यार्थी चमकले.
सीबीएसई शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. याशिवाय जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सर्वाधिक मराठी माध्यमाच्या २४७ विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे १४, कन्नड माध्यम १०, मराठी-इंग्रजी माध्यमाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १० हजार ७५३ जणांनी परीक्षा दिली होती.
आठवीचा निकाल १६.९७ टक्के लागला असून, राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ९ विद्यार्थी चमकले आहेत. जिल्ह्यातील ४२३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील जिल्ह्यातील टॉप टेन विद्यार्थी
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले दहा विद्यार्थी : अग्रजा गणेश गुरव, शाहीद शब्बीर तांबोळी, श्रावणी सचिन सपकाळ, अमय अनिल जाधव, सुजल श्रीकांत कणसे, विश्वभारती विनायक पाटील, अभिजित भगवान जावडे, पार्थ चंद्रकांत पाटील, चिन्मय नामदेव गुरव.
आठवी - निर्झरा अनिल गायकवाड, सार्थक महेश पाटील, आदित्य विजय खिलारी, श्रेणिक प्रताप शिंदे, अर्थव विजय खिलारी, अनिकेत शामराव शिंदे, स्वरा श्रीकांत अहंकरी, मधुरा प्रताप पाटील, आयुष्णी विजय जाधव, वैभव दादासाहेब खांडेकर.
अग्रजा, शाहीद सहावी
अग्रजा गणेश गुरव (९५.९७ टक्के, जि. प. शाळा, आरग, ता. मिरज), शाहीद शब्बीर तांबोळी (९५.९७ टक्के, जि. प. शाळा दहिवडी, ता. तासगाव) या दोन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक आला आहे.