सांगलीतील बेदाणा निघाला सोलापूरच्या बाजारात, आठवड्याला सरासरी ४५० टन आवक; सांगली बाजार समितीपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:52 PM2023-04-24T17:52:54+5:302023-04-24T17:57:23+5:30
सांगलीसह कर्नाटकचा बेदाणाही सोलापूरकडे वळला
सांगली : सोलापूरबाजार समितीमध्ये बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जावक सुरू आहे. सांगलीसह कर्नाटकचा बेदाणाही सोलापूरकडे वळला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी तिकडे आकर्षित झाले आहेत. प्रत्येक आठवड्याची बेदाण्याची आवक सरासरी ४५० ते ५५० टनांपर्यंत पोहोचली आहे. चांगल्या बेदाण्याला २२१ रुपये प्रतिकिलो इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्याचा सरासरी भाव १६० रुपये प्रतिकिलो आहे. सांगली बाजार समितीत सरासरी १४० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सोलापुरात गेल्या आठ वर्षांपासून बेदाणा सौदे सुरू आहेत. सांगलीच्या तुलनेत सोलापुरात द्राक्ष आणि बेदाण्याचे उत्पादन खूपच कमी आहे. तरीही सौद्यामध्ये उलाढाल मात्र जोमात असते. गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून बेदाणा मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीत येत आहे. विजापूर, गुलबर्गा, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत द्राक्षक्षेत्र वाढल्याचा फायदा सोलापूर बाजार समितीला झाला आहे. त्याच्या जोरावर सौदे वाढले आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढल्याने सांगलीचा बेदाणाही सोलापूरला पसंती देऊ लागला आहे.
सोलापुरातील आवक दर आठवड्याला वाढत असल्याचे आडत व्यापारी शिवानंद शिंगडगाव यांनी सांगितले. विजापूर, तासगाव, सांगली, पंढरपूर व सोलापूरचे व्यापारी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. दर चांगला मिळत असल्याने हंगाम टिकून राहील, असे ते म्हणाले.
सोलापूरला चारही दिशांनी जोडणारे रस्ते चांगले झाल्याचा फायदा या बाजारपेठेला मिळाला आहे. विजापुरातून सोलापूरला जाण्यासाठी सव्वा तास लागतो. तासगावला येण्यासाठी मात्र अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे सोलापूरला गेल्यास वाहतुकीचा खर्च वाढतो. त्याचा फायदा सोलापूरला मिळत आहे.
सांगली समितीपुढे आव्हान
सांगली व तासगावचा बेदाणा सोलापूरला जाऊ लागल्याने सांगली बाजार समितीला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. पारदर्शी सौदे, उधळपट्टीला लगाम, शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट, दर्जेदार बेदाण्याला चांगला भाव यासाठी लक्ष द्यावे लागणार आहे.