स्वातंत्र्यसूर्य : जी. डी. (बापू) लाड; सहाशे किलोमीटर जाऊन लुटला धुळ्याचा खजिना
By संतोष भिसे | Published: August 9, 2022 03:34 PM2022-08-09T15:34:50+5:302022-08-09T15:35:34+5:30
क्रांतिसिंहांच्या प्रतिसरकारमध्ये आल्यावर लढ्याला गती आली. या सरकारची पत्री सरकार म्हणून ओळख निर्माण करण्यात बापूंचा मोठा वाटा राहिला.
स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांची प्रशासन यंत्रणा खिळखिळी करण्यात जी. डी. बापू लाड आघाडीवर होते. क्रांतिसिंहांच्या प्रतिसरकारसाठी काम करताना सर्वाधिक पत्री ठोकण्याचा पराक्रम बापूंच्या नावे आहे! स्वातंत्र्याचा लढा लढायचा, तर पैसा पाहिजेच. यातूनच स्वातंत्र्यसैनिकांची नजर ब्रिटिशांच्या खजिन्यांवर गेली. धुळे खजिन्याची लूट आणि शेणोलीजवळ पे स्पेशल रेल्वेची लूट या घटना थरारक होत्या.
उमेदीच्या वयातच स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलेल्या बापूंना भूमिगत काळात अनेक जिवाभावाचे मित्र मिळाले. धुळे भागातले उत्तमराव पाटील त्यापैकीच एक. ब्रिटिशांच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना माहिती होती. धुळ्याचा खजिना लुटण्याची कल्पना त्यांचीच. बापूंपुढे ती मांडताच लगेच आखणीही झाली. कुंडल ते धुळे हा साडेपाचशे-सहाशे किलोमीटरचा प्रवास. उत्तमराव पाटील यांच्या सोबतीने बापू, नागनाथअण्णा यांच्यासह १५-१६ जणांनी धुळे गाठले. १३ एप्रिल १९४४ चा दिवस. करवसुलीची सर्व्हिस गाडी चिमठाणा गावात आल्याचे कळले.
क्रांतिकारकांनी त्वरित चिमठाणा गाठले. सर्व्हिस गाडीत चालक आणि दोघे पोलीस इतकाच बंदोबस्त. क्रांतिकारकांनी गाडीला घेराव घातला. आतील सर्वांचे हातपाय बांधून टाकले. गाडीतील साडेपाच लाखांचा खजिना हस्तगत केला. लुटीची खबर कर्णोपकर्णी होण्यापूर्वीच सांगलीकडे कूच केली. याच पैशांतून त्यांनी प्रतिसरकारच्या तुफान सेनेसाठी बंदुका आणि गोळ्यांची तजवीज केली. बापू या दलाचे फिल्डमार्शल-सरसेनापती- बनले.
गणपती दादू तथा जी. डी. लाड यांचा जन्म औंध संस्थानातल्या कुंडलचा. तारीख ४ डिसेंबर १९२२. शाळकरी वयातच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यामुळे ते प्रभावित झालेले. दीनदलितांवरील अन्याय, अस्पृश्यता, ब्रिटिशांचा जुलूम यामुळे बापूंच्या मनात अन्यायाविरोधात लढण्याचा अग्निकुंड सतत धगधगत राहायचा. पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेले. तोच टर्निंग पॉईंट ठरला. पुण्यात शिवाजी होस्टेलमध्ये राहताना सेवादलाची शाखा चालवू लागले. पुन्हा पुणे सोडून कुंडल जवळ केले. स्वातंत्र्यलढ्यात थेट उडी घेतली.
ब्रिटिशांची प्रशासकीय यंत्रणा खिळखिळी करणे याकडे त्यांचे लक्ष राहिले. वसगडे, वायफळेच्या चावड्यांवर हल्ले करून तिरंगा झेंडा फडकावला. क्रांतिसिंहांच्या प्रतिसरकारमध्ये आल्यावर लढ्याला गती आली. या सरकारची पत्री सरकार म्हणून ओळख निर्माण करण्यात बापूंचा मोठा वाटा राहिला. शेणोलीची पे स्पेशल रेल्वेची लूट ही अत्यंत धाडसी योजना. ब्रिटिश कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैेसे घेऊन धावणारी ही रेल्वे शेणोलीजवळ लुटली. या लुटीमध्ये बापूंच्या सोबतीला नागनाथअण्णा नायकवडी, रामूतात्या वस्ताद, बंडू लाड, आरगचे रामभाऊ विभूते आदी मंडळी होती. ही लूट बरीच गाजली. १९४३ पासून बापूंना भूमिगत व्हावे लागले. याच धामधुमीत विवाह झाला. सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या गर्दीत मध्यरात्री बापूंनी नवसाबाईच्या कपाळी रक्ताचा टिळा लावला! नंतर नवसाबाईंचे नाव विजया ठेवण्यात आले.
याच काळात ब्रिटिशांविरोधात देवराष्ट्रे, पलूस, कडेगाव, खानापुरातील डोंगराळ भागात लपून बापूंच्या कारवाया चालायच्या. लोहमार्गाच्या फिशप्लेटस काढणे, टेलिग्रामच्या तारा तोडणे, पोस्ट कार्यालयांची लूटमार अशा कारवाया करुन ब्रिटिशांच्या संपर्क आणि प्रशासकीय यंत्रणेवर त्यांनी घाव घातले. धुळ्याची लूट, शेणोलीची पे स्पेशल गाडीची लूट, कुंडल बँकेतील लूट यामुळे बापूंचा दबदबा निर्माण झाला होता. तुफान सैनिक दल तुफान काम करत होते. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढताना बापूंना गुन्हेगारांचाही बंदोबस्त करावा लागला होता. महात्मा गांधी व क्रांतिसिंहांचा जयजयकार करत सर्वसामान्यांना लुटणाऱ्यांच्या, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. प्रतिसरकार म्हणून समांतर सरकार चालविताना जनता न्यायालये, लष्करी प्रशिक्षण केंद्रे, युद्ध मंडळ, धोरण समिती, न्यायनिवाडा, गावांची सफाई असे उपक्रमही राबविले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बापू मराठवाड्यात रझाकारांविरोधात लढण्यासाठी सरसावले. तेथील तरुणांना शस्त्रे पुरविली, त्यासाठी तुरुंगवासही भोगावा लागला. १९४८ ते १९५० या काळात येरवडा, नाशिक, सांगलीच्या कारागृहात राहावे लागले. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात सहभागी झाले. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत यासाठी २००२ मध्ये कुंडलच्या माळावर क्रांती साखर कारखान्याची उभारणी केली. १९५७ ला विधानसभेवर, तर १९६२ ला शेतकरी कामगार पक्षातर्फे विधान परिषदेवर त्यांची निवड झाली.