दंडोबा अरण्यातील सांबर सांगली शहरात, सांबर आढळल्यास संपर्क साधण्याचे वनविभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:09 PM2022-12-03T13:09:45+5:302022-12-03T13:11:42+5:30
मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबर या वन्यप्राण्यांचे दर्शन शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना दर्शन झाले
कुपवाड : मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबर या वन्यप्राण्यांचे दर्शन शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना दर्शन झाले. मिरज एमआयडीसी, कुपवाड परिसरात दिसलेले हे सांबर प्राणी दंडोबा अरण्यातील असून ते सांगली परिसरातील शेतीत गेले असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबराचे दर्शन काही नागरिकांना झाले होते. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे एक पथक तातडीने रवाना झाले. सांबर मिरज एमआयडीसी ते कुपवाड रस्ता बडे पीर दर्गा परिसरात आले. त्यानंतर ते कुपवाड विश्रामबाग रस्त्यावरील चाणक्य चौकातून पुढे कुपवाड फाटा व पुढे चांदणी चौक परिसरातील शेतीत गेल्याचे वनअधिकाऱ्यांच्या नजरेस पडले.
हे सांबर मिरज तालुक्यातील दंडोबा अरण्यातील असावे, अशी शंका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दंडोबा अरण्यात विविध वन्यजीव प्राणी आहेत. त्यातीलच हे एक वन्यजीव प्राणी आहे. ते भरकटत नागरी वस्ती परिसरात आले आहे. सांबर कोणास आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.