मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मराठी नाट्यसंमेलन मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित
By शीतल पाटील | Published: November 1, 2023 08:01 PM2023-11-01T20:01:01+5:302023-11-01T20:01:17+5:30
Sangli News: सांगलीत ४ व ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
- शीतल पाटील
सांगली - सांगलीत ४ व ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नाट्यसंमेलनाच्या मुहुर्तमेढ स्वागत समितीचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे यांनी दिली.
सांगलीत शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची मुहुर्तमेढ म्हणजेच शुभारंभ होणार होता. रंगभूमिदिनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली होती. स्वागताध्यक्षपदी आमदार सुधीर गाडगीळ यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या तयारीसाठी समितीच्या बैठका झाल्या होत्या.
नाट्यपंढरी सांगलीत नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. तर नाट्य संमेलन मुंबईत होणार होते. पण सध्या मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यासह राज्यात आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमही उधळून लावले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे सावट नाट्य संमेलनावर होते. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्य संमेलन कार्यक्रमात राजकीय नेत्यांचा सहभाग नको, अशी भूमिका घेतली होती.
या पार्श्वभूमीवर स्वागत समितीचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, कार्यवाह सनित कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, शशांक लिमये, हरिहर म्हैसकर आदी पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती समितीलाही कळवण्यात आले आहे.
सांगलीमध्ये चार आणि पाच नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रम होणार होता. पण तो स्थगित करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले. तेच याबाबतचा निर्णय जाहीर करतील आणि पुढील तारीख जाहीर केली जाईल.
- गिरीश चितळे ( कोषाध्यक्ष, स्वागत समिती)