सांगलीच्या वैभवात भर, विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:27 PM2019-09-09T12:27:20+5:302019-09-09T12:29:42+5:30
सांगली : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्काडा प्रणाली वापरून उभारलेल्या आणि सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 828 मीटर लांबीच्या विश्रामबाग रेल्वे ...
सांगली : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्काडा प्रणाली वापरून उभारलेल्या आणि सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 828 मीटर लांबीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, महावितरणच्या संचालिका निता केळकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपअभियंता संजय देसाई, माजी आमदार नितीन शिंदे, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, शाखा अभियंता राजेंद्र मोगली, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, टि. ॲन्ड टी. इन्फ्रा लि. पुणे चे विकास पुराणिक, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.
सांगली येथील विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुल हा मिरज तालुक्यातील पद्माळे, सांगली, अंकली, इनामधामणी विश्रामबाग, माधवनगर, पद्माळे रस्ता राज्य मार्ग क्र. 154 भाग विश्रामबाग ते माधवनगर रेल्वे गेट क्र. 137 येथे येतो.
एमआयडीसी सांगली, साखर कारखाना, सांगली कुपवाड, यशवंतनगर, बालाजीनगर, संजयनगर सर्व शहरी विस्तारीत भाग व तासगाव कराड असा उत्तरेकडील भागाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश सन 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येवून यासाठी 200 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली.
या मार्गावरील रेल्वे गेट दिवसातून 52 वेळा बंद व उघड करावे लागत असल्याने रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होवून रूग्ण सेवेला व इतर आवश्यक वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच वर्दळीची वाहतूक असल्याने वारंवार अपघात घडत होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सदर उड्डाण पुलासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. या उड्डाण पुलामुळे वाहतूकीचा त्रास कायमस्वरूपी बंद होणार आहे.
या पुलाची लांबी 828 मीटर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 10.50 मीटर रूंदीचे 25 मीटरचे 6 गाळे व रेल्वे विभागामार्फत 30 मीटरचा एक गाळा असा एकूण 180 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. विश्रामबाग बाजूस 10.50 मीटर लांबीचा एक व कुपवाड बाजूस 13.50 मीटर लांबीचा एक व्हेइकल अंडर पास ठेवण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस 5.50 मीटर रूंदीचे सेवा रस्ते करण्यात आले आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी या उड्डाण पुलासाठी अतिक्रमण काढणे व त्यांचे पुनर्वसन करणे, तसेच पोलीस विभाग, रेल्वे विभाग, महानगरपालिका, विद्युत विभाग तसेच विभागांचे एकत्रित सहकार्य जमवून आणणे इत्यादी कामे अत्यंत जलदगतीने उत्कृष्ठ पध्दतीने केली. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण झाले.