मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी लिफ्टचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:24+5:302021-03-26T04:26:24+5:30
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून प्रवाशांच्या वापरासाठी त्या उपलब्ध ...
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून प्रवाशांच्या वापरासाठी त्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
मिरज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, ३ व ४ वर बसविलेल्या लिफ्टचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे व पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आले.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, मिरज स्थानकात प्लॅटफॉर्मवर नव्याने लिफ्ट बसविण्यात आल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांची सोय झाली आहे. लिफ्टमुळे प्रवाशांना ओव्हरब्रीज सहज ओलांडता येईल.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी, प्रवाशांसाठी सुविधा म्हणून या दोन लिफ्ट सुरू केल्याचे सांगितले.
चाैकट
आधुनिकीकरणाची मागणी
पाच वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात मिरज व कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके बनविण्याची घोषणा झाली. मात्र निधीअभावी हे काम रखडले आहे. कोल्हापूर व मिरज या ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकात वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, सरकता जिना या सुविधांची प्रतीक्षा आहे. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करून प्रवासी सुविधांसह रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचेही काम गतीने पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.