सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:28 PM2023-07-19T17:28:09+5:302023-07-19T17:28:22+5:30
खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली
सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली आहे.
जिल्ह्यात दडी मारलेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा होता. चार दिवसांत चार टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसात ५४ मिलिमीटर तर वारण धरण क्षेत्रात २९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या १५.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये : मिरज २.६ (६८.८), जत १.६ (५६.४), खानापूर ३ (५०.७), वाळवा ४.६ (७२), तासगाव ५ (८३.७), शिराळा १६.३ (२११.२), आटपाडी १.३ (५४.३), कवठेमहांकाळ २.१ (५४), पलूस ३.१ (५९.१), कडेगाव ३.४ (६२.८).
कोकरूड बंधारा पाण्याखाली.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरूड येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्याच्या वर एक फुटापर्यंत पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांना कोकरूडला येण्यासाठी तुरुकवाडीमार्गे पाच- सहा किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागत आहे.