सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; खरीप पिकांचे नुकसान, रब्बी पेरण्या थांबल्या
By अशोक डोंबाळे | Published: October 12, 2022 06:33 PM2022-10-12T18:33:12+5:302022-10-12T18:33:35+5:30
वाळवा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस बुधवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.८ मिलिमीटर, तर वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधारेमुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून, काढणी-मळणीतील खरीप पिकांचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागांत तो मुसळधार होता. त्यामुळे ओढे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.
परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, रब्बी हंगामातील पेरण्याही संततधार पावसामुळे थांबल्या आहेत.
जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)
तालुका दिवसातील पाऊस एकूण पाऊस
मिरज १७.५ ५४४.४
जत २६.४ ५७५.१
खानापूर ३२ ६९५.९
वाळवा ५१.९ ७६०.३
तासगाव २३.१ ६२०.१
शिराळा ४५.५ १३३२.७
आटपाडी ५.८ ४१८.१
क. महांकाळ ३४.३ ६८०.६
पलूस २६.९ ५५३.८
कडेगाव ४०.७ ६३८.३
धरणे भरली काठोकाठ (साठा टीएमसीत)
धरण क्षमता सध्याचा पाणीसाठा
कोयना १०५.२५ १०४.६०
धोम १३.५० १३.५०
कण्हेर १०.१० १०.१०
वारणा ३४.३४ ३४.४०
अलमट्टी १२३ १२३.०१