सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, कृष्णा नदीची पाणीपातळी १५ फुटांवर; अलमट्टीतून एक लाख क्युसेकने विसर्ग
By अशोक डोंबाळे | Published: July 20, 2024 04:01 PM2024-07-20T16:01:59+5:302024-07-20T16:03:48+5:30
धरणात पाण्याची आवक जास्त
सांगली : अलमट्टी धरणामध्ये गुरुवारी ९९.३२ टीएमसी पाणीसाठा होता. यामध्ये १.९ टीएमसीने कपात करून शनिवारी ९७.४२ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून शनिवारी दुपारी दीड वाजेपासून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. कोयना ४८ टक्के तर वारणा (चांदोली) धरण ६८ टक्के भरले असून धरण क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत आहे. कृष्णा नदीचीसांगली आयर्विन पूल येथे १५ फुटांवर पाणीपातळी गेली आहे.
कोयना, वारणा धरण क्षेत्रात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात दोन फुटांनी वाढली आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचे सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे.
कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७.४२ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात ५०.७७ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ४८ टक्के भरले आहे. वारणा धरणात २३.५४ टीएमसी पाणीसाठा होऊन ६८ टक्के भरले आहे.
धरणातील पाणीसाठा
धरण - आजचा साठा - एकूण क्षमता
कोयना - ५०.७७ - १०५.२५
धोम - ५.७३ - १३.५०
कन्हेर - ४.२६ - १०.१०
वारणा - २३.५६ - ३४.४०
दूधगंगा - १३.९५ - २५.४०
राधानगरी - ६.०८ - ८.३६
तुळशी - २.२५ - ३.४७
कासारी - १.९६ - २.७७
पाटगांव - ३.०६ - ३.७२
धोम-बलकवडी - १.३६ - ४.०८
उरमोडी - ३.०७ - ९.९७
तारळी - २.७४ - ५.८५
अलमट्टी - ९७.४२ - १२३.०८
जिल्ह्यात ९.८ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ८.२ (३०५.१), जत ०.८ (२५१), खानापूर १.५ (२५६.६), वाळवा १७.१ (४१७.५), तासगाव ४.१ (३१७), शिराळा ३६.७ (५७१.८), आटपाडी ०.६ (२२४.२), कवठेमहांकाळ २.१ (३२७.९), पलूस १३.५ (२९४.२), कडेगाव ५.८ (३०८.५).
कृष्णा नदीची पाणीपातळी
पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)
कृष्णा पूल कराड ९.०८
बहे पूल ७.०३
ताकारी पूल १८
भिलवडी पूल १८.०८
आयर्विन १५
राजापूर बंधारा ३०.०१
राजाराम बंधारा ३५.०५