अनैतिक संबंधातून तरुणाचा खून संख येथील घटना : झोपेतच हल्ला; कुºहाडीचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:50 AM2018-10-17T00:50:17+5:302018-10-17T00:51:02+5:30
अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला.
संख : अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित हल्लेखोर धर्माण्णा बिराप्पा करजगी (२६, रा. संख) यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने या खुनाची कबुली दिली आहे.
संख येथील मध्यम प्रकल्पाच्या तलावाजवळील व्हनगोंड वस्तीवरील शेतात सिद्धगोंडा बिरादार हा आई-वडील व भाऊ यांच्यासमवेत राहत होता. काही महिन्यांपूर्वी बिरादार कुटुंबियांनी नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. सिध्दगोंडा रात्री नवीन बांधकामावर मुक्कामास जात असे. सोमवारी नवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी सिद्धगोंडा गावात गेला होता. कार्यक्रम संपल्यावर मध्यरात्री एक वाजता तो शेतातील नवीन घरात झोपला. दरम्यान, तो गाढ झोपेत असताना त्याच्या मानेवर हल्ला करण्यात आला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी बांधकामासाठी कामगार आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, सहायक निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सिद्धगोंडा बिरादार याचे संशयित धर्माण्णा करजगी याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. करजगीला याची कुणकुण लागल्यानंतर त्याने सिद्धगोंडाला समजावून सांगितले होते. पण तरीही त्याने करजगीच्या पत्नीशी संबंध सुरुच ठेवले. यातून दोघांत अनेकदा वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी दोघांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर करजगी याने सिद्धगोंडाला जिवंत ठेवायचे नाही, असा निर्णय घेतला. तो बांधकामावर झोपण्यास जातो, हे त्याला माहिती होते. त्यानुसार तो तेथे कुºहाड घेऊन दबा धरुन बसला. मध्यरात्री सिद्धगोंडा तेथे येऊन झोपल्यानंतर करजगी याने त्याचा खून केला. त्याला बुधवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
कुºहाड कूपनलिकेत
सिद्धगोंडचा खून केल्यानंतर करजगी याने रक्ताने माखलेली कुºहाड एका कूपनलिकेत फेकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कूपनलिका खुदाई करणाऱ्या कामगारांची मदत घेऊन या कुºहाडीचा शोध सुरु ठेवला आहे. पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नव्हती. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु असल्याचे सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.