जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही मुलींच्या पलायनांच्या घटना कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:41+5:302021-06-25T04:19:41+5:30
कमी वयात असलेले बाहेरचे आकर्षणामुळे अनेकदा मुलींच्या पलायनाच्या घटना घडत असतात. जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांतील आलेख तपासला तर सरासरी ...
कमी वयात असलेले बाहेरचे आकर्षणामुळे अनेकदा मुलींच्या पलायनाच्या घटना घडत असतात. जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांतील आलेख तपासला तर सरासरी पावणे दोनशे मुली दरवर्षी घरातून पलायन करीत आहेत, तर त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक मुली पोलिसांच्या शोधानंतर सापडतात. गेल्यावर्षीची सुरुवातीपासूनच कोरोनाचा शिरकाव होत होता. त्यानंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन व त्यानंतर आतापर्यंत कडक निर्बंध लागू असून, गेल्यावर्षी दिवाळीच्या कालावधीतील दोन महिन्यांचा अपवाद वगळता सर्व व्यवहार अंशत: सुरू आहेत. तरीही अशा स्थितीतही गेल्यावर्षी १६९ मुलींनी पलायन केले. पलायन केलेल्या मुलींमधील १२९ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले होते. २०१९ मध्येही १६९ मुलींनी पलायन केले होते.
पलायन केलेल्या मुलींमध्ये बहुतांश प्रकरणे ही लग्नाच्या आमिषाने आणि परिचितानेच पळवून नेल्याचे जास्त आहेत. याशिवाय घरातील होणाऱ्या वारंवारच्या त्रासाला कंटाळूनही काही मुलींनी पलायन केले आहे. मात्र, अशा मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे निर्बंध असतानाही मुलींच्या पलायनाच्या घटना मात्र कायम असल्याचे चिंताजनक चित्र कायम आहे.
चौकट-
तीन वर्षांत ५८८ मुलींचे पलायन
जिल्ह्यात गेल्या साडेतीन वर्षांचा आढावा घेतला, तर ५८८ मुलींनी पलायन केले आहे. यातील १३८ मुलींचा शोध लागला आहे, तर ४५० मुलींचा शोध लागलेला नाही.
* पलायनानंतर अनेक मुली परस्पर लग्न करीत असल्याने घरचे आपल्याला पुन्हा स्वीकारतील का या भीतीने घरावर तुळशीपत्र ठेवले जात आहे. त्यामुळे पलायन केलेल्या मुलींचा शोध पोलिसांसाठीही आव्हान बनत आहे.
चौकट -
शोधकार्यात अडचणी काय?
* आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुलींचा शोध घेणे पोलिसांना शक्य असले तरी बहुतांश वेळा मुली स्वत:हूनच पालकांकडे परत जाण्यास तयार होत नाहीत.
* पालकांच्या मनाविरोधात पलायन केलेल्या मुली तर घराकडे, गावाकडेही येण्याचे टाळत असल्याने त्यांचा शोध आव्हान बनते.
* अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याबरोबरच त्यांना परत पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलिसांचे प्राधान्य असले तरी अनेकदा पालकही मुलींना नाकारत असल्याचे प्रकार घडतात.
कोट
जिल्ह्यातील मुलींच्या पलायनाच्या घटना कायम असल्या तरी त्यांचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले जाते. स्वाधिन करीत असताना त्या मुलींचे समुपदेशन करून तिला मानसिक आधारही दिला जातो जेणेकरून तिला अपराधीपणाची भावना निर्माण होणार नाही.
मायादेवी काळगावे, सहा. पोलीस निरीक्षक
चौकट
जिल्ह्यातील बेपत्ता मुली
२०१८ १५४
२०१९ १६९
२०२० १६९
२०२१ मेपर्यंत ९६