सांगलीतील घटना : ऊस वाहतूक बैलगाडीवानांचा प्राणीमित्रांवर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:14 PM2018-12-13T17:14:21+5:302018-12-13T17:18:36+5:30
ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारु नका, असे सांगण्यास गेलेल्या प्राणीमित्रांवर बैलगाडीवानांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मुस्तफा मुजावर (रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) हे जखमी झाले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
सांगली : ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारु नका, असे सांगण्यास गेलेल्या प्राणीमित्रांवर बैलगाडीवानांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मुस्तफा मुजावर (रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) हे जखमी झाले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारले जातात. काही वेळेला तर तीक्ष्ण हत्याराने टोचले जाते. त्यामुळे बैलांचा छळ करु नका, त्यांना मारहाण करु नका, हे सांगण्यासाठी प्राणीमित्रांकडून ऊसतोडणी मजूर व बैलगाडीवानांच्या पाल्यावर जाऊन प्रबोधन केले जात आहे. तरीही ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीवानांकडून बैलांचा छळ सुरु आहे. गाडीमध्ये दीड टनच ऊस घालून वाहतूक करण्याचा नियम आहे. पण सतराशे ते अठराशे किलो ऊस घालून वाहतूक केली जात आहे.
पंचशीलनगर येथे रेल्वे फाटकाजवळ असाच प्रकार बुधवारी सायंकाळी सुरु होता. याची माहिती मिळताच प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सुनील तावरे यांनी तेथे धाव घेतली व बैलांना मारहाण करणाऱ्या गाडीवानांकडून त्यांनी चाबूक काढून घेतले. यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.
दहा ते बारा बैलगाडीवान जमले. त्यांनी कोयते घेऊन प्राणीमित्रांवर हल्ला चढविला. यामध्ये हाताला कोयता लागल्याने मुस्तफा मुजावर जखमी झाले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले.