बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करा, आमदार जयंत पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 04:48 PM2023-03-23T16:48:38+5:302023-03-23T16:48:57+5:30
याबाबत तत्काळ आदेश दिले तर काही काळ बेदाण्याच्या पडत्या किमती नियंत्रणात येतील
दत्ता पाटील
तासगाव : द्राक्ष दरात घसरण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल वाढला आहे. मात्र गेल्या काही दिवसात बेदाण्याचे दरही ढासळले आहेत. त्यामुळे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात तात्काळ समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज, गुरुवारी अधिवेशनात केली.
तासगाव, पंढरपूर भागात बेदाण्याचे सौदे सर्वात जास्त होतात. द्राक्षाच्या किंमती आता खाली पडलेत. बेदाणा देखील आता फार मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. मागच्या पंधरा-वीस दिवसात चाळीस रुपयांनी बेदाण्याचे दर घसरले आहेत. बेदाणा किलोला 50 रुपयाला विकला जातोय. आपल्याला काय करता येत नसेल तरी, बेदाणा पोषण आहारात समावेश करावा.
याबाबत तत्काळ आदेश दिले तर काही काळ बेदाण्याच्या पडत्या किमती नियंत्रणात येतील. पोषण आहारात बेदाणा दिला तर द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळेल. त्यामुळे पोषण आहारात बेदाणा देता येईल का याची शक्यता बघून शासनाने बेदाण्याचा पोषण आहारात त्वरित समावेश करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी गुरुवारी अधिवेशनात केली.