वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच भाजपमध्ये इनकमिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:11 PM2019-07-31T15:11:14+5:302019-07-31T15:13:27+5:30
इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात ...
इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती 'वंचित'चे प्रदेश सचिव शाहीर सचिन माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
इस्लामपूर येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत माळी बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट रोजी सांगली येथे जिल्ह्यातील वंचित आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाचे अन्नाराव पाटील,किसनराव चव्हाण,रेखा ठाकूर,अशोक सोनवणे हे मुलाखती घेणार आहेत.
वंचीतने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. काँग्रेसला ४० जागा देऊ असा प्रस्ताव दिला आहे,त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही. मात्र वंचितने आंबेडकर-ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली सर्व २८८ जागा लढण्याची तयारी केली आहे.घराणेशाहीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची वाताहत झाली आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध वंचित आघाडी असाच सामना होईल.
राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार, आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त करत मतांचा खेळ मांडल्याची टीकाही सचिन माळी यांनी केली.