अवकाळी अनुदान अडकले बँकेत
By admin | Published: October 15, 2015 11:21 PM2015-10-15T23:21:31+5:302015-10-16T00:52:30+5:30
शेतकऱ्यांची नाराजी : आठ कोटींचे अनुदान; साडेचार हजार लाभार्थी
तासगाव : फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून तालुक्यातील १३ हजार ४१३ शेतकऱ्यांना आठ कोटी २५ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाकडून पंधरा दिवसांपूर्वी संबंधित बँकांकडे हे अनुदान वर्ग करूनदेखील अद्यापही अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी असून, तात्काळ अनुदान देण्याची मागणी होत आहे.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, तसेच गारपीट झाली होती. या पावसाने रब्बी, हंगामी बागायती, तसेच द्राक्षासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. त्याची दखल घेत शासकीय यंत्रणेमार्फत तातडीने अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाकडून झाला. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार, हंगामी बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी पंधरा हजार, तर फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १३ हजार ४१३ शेतकऱ्यांना पिकानुसार आठ कोटी २५ लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती.
महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २५ आॅगस्टला ४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे २ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० सप्टेंबरला ८ हजार ९४४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान संबंधित बँकांत वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात अवकाळीचे सर्वाधिक अनुदान तासगाव तालुक्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान दोन टप्प्यात बँंकांकडे वर्ग करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान दहा दिवसांपूर्वी संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. हे अनुदान तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.
- सुधाकर भोसले, तहसीलदार
महसूल विभागाकडून जिल्हा बँकेकडे अनुदान वर्ग करून अनेक दिवस झाले आहेत. तरीही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. रब्बी हंगाम, द्राक्षबागांच्या पीक छाटणीचा हंगाम सुरू आहे. अनुदान वेळेत मिळाल्यास अडचणीतील शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. अनुदान वर्ग झाले नाही, तर आंदोलन करणार आहे.
- हरिष खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना