‘म्हैसाळ’चा विसर्ग वाढवा, अन्यथा सांगोलेचे पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:59 PM2018-11-14T22:59:33+5:302018-11-14T22:59:38+5:30
जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची ...
जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची मागणी पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात यावे किंवा पाण्याचा विसर्ग वाढवून त्यांना पाणी सोडावे. अन्यथा आम्ही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.
जत तालुक्यात सुरू असलेल्या म्हैसाळ योजना कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील व सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेचे सात विद्युतपंप सुरू आहेत. त्यामुळे ७५० क्युसेक पाणी कालव्यातून येणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी जत तालुक्यात येत आहे. त्यातील ७५ क्युसेक पाणी सांगोला तालुक्यात सोडण्याचा घाट अधिकाºयांनी घातला आहे. परंतु आम्ही जत तालुक्यातून पाणी पुढे सोडणार नाही. जत तालुक्यातील म्हैसाळ कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ५५० क्युसेक इतकी आहे. परंतु २५० क्युसेक पाणी सोडले जात असले तरी प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी येथे येत आहे. जत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात फक्त आठ इंच इतका कमी पाऊस झाला आहे. येथील शेतकºयांनी पाण्यासाठी पैसे भरले आहेत. परंतु पाणी सोडले जात नाही. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील काही शेतकरी पैसे भरत नाहीत, परंतु त्यांना पाणी मिळत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
तालुक्यात आलेले पाणी व भरलेले पैसे याचा ताळमेळ लागत नाही. पैसे जादा भरले आहेत आणि पाणी कमी आले आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील कालव्यामधून कर्नाटक राज्यात पाणी गेले आहे. याला सर्वस्वी संबंधित शाखा अभियंता जबाबदार आहे. या अभियंत्यावर कारवाई करून त्याच्याकडून कर्नाटकात गेलेल्या पाण्याचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.
जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जत पं. स. सभापती सुशिला तांवशी, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तांवशी, माजी सभापती मंगल जमदाडे, श्रीदेवी जावीर आदी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता नलवडेंची बदली करा
पाणी सोडण्याचे व त्याचे नियोजन करण्याचे अधिकार एकाच अधिकाºयांना द्यावेत. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे हे मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. त्यामुळे तेथे पैसे न भरताही पाणी मिळत आहे. त्यांची तेथून अन्यत्र बदली करावी, अशी मागणी या बैठकीत आमदार विलासराव जगताप यांनी केली.