पाणीपुरवठा पंपगृहाच्या ट्रान्स्फाॅर्मरची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:27+5:302021-07-31T04:27:27+5:30
महापालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्यांबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी निवेदन दिले. यावेळी मंत्री विश्वजित कदम, उमेश ...
महापालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्यांबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी निवेदन दिले. यावेळी मंत्री विश्वजित कदम, उमेश पाटील, उत्तम साखळकर उपस्थित होते.
सांगली : कृष्णा नदीच्या पुरात महापालिकेच्या पंपगृहाचे ट्रान्स्फाॅर्मर पाण्याखाली जात असल्याने सांगली व कुपवाडचा पाणीपुरवठा खंडित होतो. त्यासाठी नदीकाठच्या विद्युत वाहिन्यांसह ट्रान्स्फाॅर्मरची उंची वाढवावी, असे साकडे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना घातले. तसेच शहरातील पथदिव्यांच्या कामासाठी २५ कोटींच्या निधीची मागणीही त्यांनी यावेळी केली.
सांगलीतील पूरग्रस्त भागाची ऊर्जामंत्री राऊत, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पाहणी केली. महापौर सूर्यवंशी यांनी राऊत यांना निवेदन दिले. ते म्हणाले की, महापूर व वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब, वाहिन्या तसेच ट्रान्स्फॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराच्या कालावधीमध्ये पूरबाधित क्षेत्रातील घरे, व्यापारी आस्थापना ५ ते ८ फूट पाण्याखाली होत्या. पूरबाधित क्षेत्रातील विद्युत ट्रान्स्फॉर्मर, वीज जोडण्या खराब झालेल्या आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील पंपगृहाच्या विद्युत वाहिन्याही कमी उंचीवर आहेत. त्यामुळे पुराचे पाणी वाढताच विद्युत पुरवठा खंडित होतो. शेरीनाला पाणी उपसा केंद्राच्या विद्युत पुरवठ्याबाबतही हीच समस्या आहे. त्यामुळे कोल्हापूर रोड लिंगायत स्मशानभूमीमधून जॅकवेलपर्यंत नदीपात्रावरून आलेल्या विद्युत वाहिनीची उंची वाढवावी, ट्रान्स्फाॅर्मरची उंची वाढवावी. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा सुरू राहील, ही बाब ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, बॉबी भोसले उपस्थित होते.