इस्लामपुरात गृह अलगीकरणातील रुग्णांमुळे संसर्गात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:21+5:302021-07-20T04:19:21+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शासकीय कोविड रुग्णालयांत खाटा उपलब्ध ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शासकीय कोविड रुग्णालयांत खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यातच बहुतांश नॉन कोविड रुग्णालये कोरोनाचे उपचार करत हजारो रुपये उकळत आहेत. तेथे येणाऱ्या बाधितांना गृह अलगीकरणाचा सल्ला दिला जात असून, त्यांच्यामुळे अख्खे कुटुंब बाधित होत आहे.
इस्लामपूर शहरात दत्त टेकडीजवळ समाजकल्याण वसतिगृहात शासकीय विलगीकरण कक्ष आहे. तो अपुरा पडत असल्याने बहुतांशी रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. मात्र ते शहरभर वावरताना दिसतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. ज्या रुग्णालयांना कोविड केंद्राची परवानगी नाही, अशा रुग्णालयांतून कोरोनाबाधितांसाठी पाच दिवसांच्या उपचाराचे किट आणि इतर चाचण्यांसाठी १० ते १५ हजार रुपयांचे पॅकेज आकारले जाते. तेथे रुग्णांची लूट सुरू असून, रुग्णांना गृह अलगीकरणाचा सल्ला दिला जातो. यातूनही रुग्ण बरा झाला नाही तर एचआरसीटी चाचणी करण्यास सांगण्यात येते. रुग्णाचा स्कोअर वाढल्यास त्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात येतो. या खासगी नॉन कोविड रुग्णालयांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण नाही.
वाळवा तालुक्यात रोज सरासरी २०० ते ३०० रुग्णांची भर पडत असून, त्यांच्या विलगीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाकडे नसल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
कोट
सध्या उपजिल्हा रुग्णालयात ३५ बेडचे कोविड केंद्र आहे. हे केंद्रही अपुरे पडत असल्याने रुग्णालयासमोर काही दिवसांतच १०० बेडचे कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम दोन दिवसात सुरू होईल.
- डॉ. नरसिंह देशमुख, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय