सांगली जिल्ह्याच्या ऑक्सिजन क्षमतेत ६० टनांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:59+5:302021-08-12T04:29:59+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही, याची सज्जता जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही, याची सज्जता जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची उच्चांकी मागणी ५५ टनांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी आठवडाभराचा अपवाद वगळता दररोजच पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करण्यात प्रशासनाला यश आले होते. तो अनुभव पाहता तिसऱ्या लाटेसाठीदेखील ६० टनांपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करण्यापर्यंत जिल्ह्याच्या क्षमतेत वाढ केली आहे.
मिरज व सांगलीतील शासकीय रुग्णालयांत एकूण तीस टन क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत. तेथे चोवीस तास पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा थेट रुग्णाच्या खाटेपर्यंत केला जातो. त्याशिवाय पुणे, रायगडमधून जिल्ह्याला दररोज २५ टन ऑक्सिजन मिळतो. सांगली व इस्लामपुरातील दोन खासगी प्रकल्पांत तो सिलिंडरमध्ये भरून वितरित केला जातो. मिरजेतील दोन खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. याप्रकारे जिल्ह्यात एकूण ६० टन ऑक्सिजनची उपलब्धता होते. तिसऱ्या लाटेसाठी सुमारे ५५ टन ऑक्सिजन दररोज अपेक्षित आहे. त्या तुलनेत सध्याचा साठा अतिरिक्त आहे.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयांत ४,५०० रुग्णांवर उपचारांची क्षमता आहे. शासकीय रुग्णालये व दोन खासगी रुग्णालयांत २४ तास ऑक्सिजनची सोय उपलब्ध आहे.