पशुधनासाठी टँकरने वाढीव पाणीपुरवठा
By admin | Published: May 5, 2016 12:15 AM2016-05-05T00:15:24+5:302016-05-05T00:21:33+5:30
दिलीप कांबळे : पाणी योजनांची वीज तोडणार नाही
तासगाव : अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी प्रशासनाकडून तातडीने पाणी टँकर सुरु करण्यासह, अन्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र अशा गावांतील पशुधन वाचविण्यासाठी यापुढे टँकरने वाढीव पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. तसेच पुढील महिन्याभरात प्रादेशिकसह पिण्याच्या पाणी योजनांचे वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी ‘एक तालुका एक मंत्री’ असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची
पाहणी करण्यासाठी मंत्री कांबळे बुधवारी तासगाव तालुक्यात आले होते. तालुक्यातील नरसेवाडी, धामणी, पाडळी गावांची पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते.
मंत्री दिलीप कांबळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची बारकाईने पाहणी करुन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने तासगाव तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. तालुक्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा ठिकाणी दुष्काळासंदर्भातील निर्णय कायद्याच्या चौकटीत न अडकवता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अनेक गावांत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत पशुधनासाठीदेखील पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक टँकर पाणी दिले जात असलेल्या ठिकाणी यापुढे जनावरांसाठी दीड टँकर पाणी पुरवठा करण्यात येईल. टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणी उपलब्ध करुन देत असताना, कायमस्वरुपी पाणी योजना सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांनी मागणी केल्यानुसार, शक्य असल्यास म्हैसाळ योजना टंचाई काळात कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे टंचाई काळात यापुढे वीज बिल भरले नसले तरीदेखील प्रादेशिक पाणी योजनांची वीज कनेक्शन्स तोडण्यात येऊ नयेत, असा
निर्णय घेतला आहे. याबाबत वीज मंत्र्यांशी चर्चा करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात
येतील, असेही कांबळे यांनी
सांगितले.
‘प्रादेशिक’च्या वीज बिल
आकारणीचा निर्णय आठ दिवसांत
प्रादेशिक पाणी योजनांना व्यावसायिक पध्दतीने वीज बिल आकारणी केली जाते. त्यामुळे योजनेचे १६ कोटींचे वीज बिल थकीत आहे. हे वीज बिल शासनाने भरुन, यापुढे सिंचन योजनांप्रमाणे कमी दराने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेऊन वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
शेततळ्यांचे कोल्हापूर, साताऱ्याचे
उद्दिष्ट सांगलीला देणार
तासगाव तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेसाठी १ हजार ३६५ प्रस्ताव दाखल झाले. तालुक्यासाठी अवघे दोनशे शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी आढावा बैठकीत करण्यात आली. याबाबत राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात शेततळ्यांना मागणी नाही. या दोन जिल्ह्यांतील शेततळ्यांचे उद्दिष्ट सांगली जिल्ह्याला देण्याचा निर्णय घेतला जाईल. याबाबत दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करुन तातडीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे जिल्'ातील शेतकऱ्यांना शेततळ्यांचा वाढीव फायदा घेता येईल.