‘ताकारी-टेंभू’ योजनेच्या पाणीपट्टी दरात वाढ
By admin | Published: December 11, 2015 10:43 PM2015-12-11T22:43:02+5:302015-12-12T00:18:14+5:30
शेतकरी नाराज : वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर
कडेगाव/देवराष्ट्रे : कायम दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी आकारणी दरामध्ये वाढ होत असल्याचा प्रस्ताव संबंधित योजनेकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वीज दरवाढीचा शॉक आता पाणीपट्टी दरवाढीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ताकारी योजनेची पाणीपट्टी बागायती पिकांसाठी ७२२ रुपयांनी वाढली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. वाढलेली पाणीपट्टी तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ताकारी आणि टेंभू या दोन्ही उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखाने पाणीपट्टी कपात करून घेतात व योजनेकडे भरतात. यामुळे दोन्ही योजना कार्यरत आहेत. २०१४-१५ च्या हंगामात ताकारी योजनेसाठी एकरी ६२११ रुपये पाणीपट्टी आकारणी ऊस पिकासाठी केली होती. परंतु आता वीज दरवाढ तसेच देखभाल-दुरुस्ती खर्च वाढल्याने २०१५-१६ साठी ताकारी योजनेची ७१७३ प्रति एकर याप्रमाणे पाणीपट्टी आकारणीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत ९६२ रुपये प्रति एकर वाढ होत आहे. (वार्ताहर)
दरवाढीबाबत फेरविचार व्हावा----याबाबत पाणी वापर संस्था सिंचनचे अध्यक्ष सुबराव महाडिक म्हणाले की, आघाडी शासनाच्या काळात डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसनमंत्री असताना राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून दुष्काळी परिस्थितीत योजनांची आवर्तने दिली. त्यापेक्षा भीषण दुष्काळ पडला असताना, सध्याचे शासन टंचाई निधीतून आवर्तनाचा निर्णय घेत नाही. शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन टंचाई निधीतून योजनांचे आवर्तन द्यावे. वाजवीपेक्षा जास्त दराने पाणी घेणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. यामुळे पाणीपट्टी दरवाढीबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
योजना वर्ष एकरी पाणीपट्टी
ताकारी २०१४-१५ ६२११
ताकारी २०१५-१६ ७१७३
वाढ ९६२ रुपये
टेंभू २०१४-१५ ६९६०
टेंभू २०१५-१६ ७६८२
वाढ ७२२ रुपये