रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:09+5:302021-04-30T04:33:09+5:30
आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच सांगली : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता ...
आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच
सांगली : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढलेली आहे. पण, दर आजही डझनाला ५०० रुपये आहे. शेतकऱ्यापर्यंत हा दर मिळत नाही, अशा तक्रारी आहेत.
नागरिकांना प्रवेशबंदी
सांगली : जिल्हा परिषदेत सदैव नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही नागरिकांची गर्दी कमी होत नसल्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शिक्षकांचे पगार रखडले
सांगली : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा उद्रेक वाढला
करगणी : सध्या आटपाडी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने या यंत्रणेलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात नागरिकांचे लसीकरण करून घेण्याकडे कल वाढला आहे.
कोरोना अहवालाला विलंब
मिरज : कोरोनाच्या आरटीपीसीआर तसेच अँटिजन चाचण्या सध्या सुरू झाल्या आहेत. काही आस्थापना तसेच शासकीय कार्यालयांकरिता कोरोना चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र त्या तुलनेत चाचण्यांसाठी असलेली यंत्रणा कमी असल्याने या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे.
शेतीच्या कामांना वेग
सांगली : कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र शेती कामे सुरूच राहणार असून, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरूही केली आहे. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची दहशत कायम आहे.
नियमित स्वच्छता करावी
तासगाव : शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी तासगाव शहरातील नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
पलूस : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मोकळ्या जागांचा विकास करा
मिरज : महापालिकेने शहरातील मोकळ्या जागेचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. दोन वर्षापूर्वी काही ठिकाणी खेळण्याचे साहित्य लावून विकास केला होता. या पध्दतीने शहरातील ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणीही होत आहे.
मजुरांमध्ये पुन्हा नैराश्य
जत : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते. यातून रोजगार प्राप्त होत असतो. परंतु सध्या काही ठिकाणी ही कामे बंद आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मजूर चिंतेत आहेत.