वाढला पारा.. घामाच्या धारा!

By admin | Published: April 14, 2017 10:16 PM2017-04-14T22:16:23+5:302017-04-14T22:16:23+5:30

पारा @ 4० अंश : कऱ्हाडकर घामाघूम; उन्हापासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

Increased mercury .. sweat stream! | वाढला पारा.. घामाच्या धारा!

वाढला पारा.. घामाच्या धारा!

Next



कऱ्हाड : एप्रिल सुरू होताच कऱ्हाड तालुक्यात उन्हाळ्याच्या प्रकोपाची सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा तडाखा सुरू होत आहे. तालुक्याच्या डोंगरी विभागातील पाणवठे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहेत. उष्माघातासारख्या उन्हाळी आजारांमुळे दवाखान्यांमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. यावर्षी तालुक्यातील पाण्याच्या स्त्रोतांची अवस्था गेल्या वर्षी पेक्षा बऱ्यापैकी असली तरी लोकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती करण्याची गरज आहे.
काही वर्षांच्या तुलनेत २०१६ मध्ये मान्सूनचे प्रमाण समाधानकारक राहिले होते. त्यामुळे तालुक्यातील नद्यांसह, पाझर तलाव व इतर पाणवठे ओसंडून वाहिले होते. परंतु अजूनही अनेक गावांमधील जलसंधारणाची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात झालेला पाणीसाठा उन्हाळा संपेपर्यंत टिकून राहिलच याची खात्री देता येत नाही. कृष्णा नदीकाठच्या गावांना पाणीटंचाई फारशी जाणवत नसते. परंतु दक्षिणच्या डोंगरी विभागातील तसेच मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये प्रत्येक वर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक मान्सूनमुळे यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. परंतु मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतर अनेक गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे.
चांगल्या मान्सूनमुळे यावर्षी तालुक्यात विक्रमी थंडीची नोंद करण्यात आली. जानेवारी महिन्यात तर किमान तापमानाचा पारा अनेक वर्षांनंतर आठ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. अगदी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत थंडीची तीव्रता जाणवतच होती. सध्या एप्रिल महिन्याच्या मध्यांतरातच कमाल तापमानाची पातळी ३९, ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. सकाळी दहा ते अगदी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडताना दिसू लागले आहेत. उन्हाळी फळे समजल्या जाणाऱ्या द्राक्षे, कलिंगड, काकड्या यांचीही बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
कऱ्हाड शहर तसेच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर कोल्ड्रिंक्सचे गाडे जागा व्यापू लागले आहेत. कृष्णा घाटावरील प्रीतिसंगमावर पोहण्यासाठी तसेच येथील बागेत फिरायला येणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. अगदी गरजेचे असेल तरच दुपारच्या वेळी लोक घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. महिला, महाविद्यालयीन तरुणींबरोबरच तरुण वर्गही दुचाकी चालवताना तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर पडताना दिसत आहे.
प्रामुख्याने कृष्णा आणि कोयना नदीपासून दूर असणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. पाझर तलावांमधील पाणी पातळीही घटू लागली असल्यामुळे जून महिन्यापर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारणाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा खरोखरच उपयोग झाला काय? हे आता लवकरच स्पष्ट होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला होता.
प्रशासनाकडून तालुक्यात हे अभियान यशस्वी ठरत असल्याचेही सांगितले जात होते. परंतु हे अभियान खरोखरच यशस्वी ठरले की नाही त्याची चाचणी पुढील काही आठवड्यांतच होणार आहे.
यावर्षी थंडीप्रमाणेच उन्हाळ्याचाही विक्रम नोंदवला जाणार अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)
उन्हाळा संपताच ये रे माझ्या मागल्या!
प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी बचतीचे आव्हान केले जात असते. अनेक स्वयंसेवी संस्थाही या पाणी बचत अभियानात सहभागी होतात. मात्र, उन्हाळा संपताच हे अभियानही संपते आणि पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी जतन करण्यात ना प्रशासनाला रस असतो ना सामान्य नागरिकांना. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाईची अवस्था ‘ये रे माझ्या मागल्या,’ अशीच बनत असते.

Web Title: Increased mercury .. sweat stream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.