चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 10:56 AM2022-08-09T10:56:53+5:302022-08-09T10:57:38+5:30
धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गंगाराम पाटील
वारणावती : चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात १८०८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज, मंगळवारी सकाळी धरणातून ५६२८ क्युसेकने वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३० एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी मुळे पाणलोट क्षेत्रात १८०८१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आज, सकाळी धरणाचे वक्राकार दरवाजातून ४००० क्युसेक विसर्ग व जलविद्युत केंद्राकडून १६२८ असा एकूण ५६२८ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जावून वाहतूक बंद झाली आहे तर शित्तूर आरळा पुलाच्या कठड्याना घासून पाणी जात आहे. चरण सोंडोली पुला जवळील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
धरणातील पाणीसाठा ३०.०८ झाला असून त्याची टक्केवारी ८४.४४ अशी आहे. पाणी पातळी ६२२.७५ मीटर झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १३० मिलीमीटर सह एकूण १५८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे.