सांगलीसाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढविला, दुष्काळी तालुक्यांना दिलासा
By अशोक डोंबाळे | Published: April 6, 2024 04:29 PM2024-04-06T16:29:20+5:302024-04-06T16:30:14+5:30
टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज
सांगली : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून ९०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून तीन हजार क्यूसेक्स सोडले जात आहे. यामुळे दुष्काळी तालुक्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. जत तालुक्यात तर टँकर भरण्यासाठीही पाणी नाही. टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. या सिंचन योजनांसाठी कृष्णा नदीत पाणी कमी पडू नये, म्हणून कोयना धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे. म्हणून सांगली पाटबंधारे मंडळाने कोयना धरण व्यवस्थापनाकडून पाणी गतीने सोडण्याची मागणी होती.
त्यानुसार कोयनेतून शनिवारी सकाळी विसर्ग वाढविला आहे. आपत्कालीन द्वारमधून ५०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे आपत्कालीन द्वारमधून सध्या ९०० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन १०० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून सध्या एकूण तीन हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करता येणार आहे.