कोरोनापाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:45+5:302021-05-11T04:28:45+5:30
सांगली : कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधी आणि आजारांचे निदान होत आहे. त्यात बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे ...
सांगली : कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधी आणि आजारांचे निदान होत आहे. त्यात बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत केवळ दाेन ते पाच रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यात सध्या किमान सहा ते सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अत्यंत दुर्मिळ असलेला हा आजार कोरोना होऊन गेलेल्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.
कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. सध्या म्युकरमायकोसिस या आजाराचा बाधितांत शिरकाव होत आहे. त्यातही मधुमेहाचा त्रास असलेल्यांना याचा धोका अधिक आहे.
दंतचिकित्सा व सर्जरीमध्ये काम करणाऱ्या शहरातील खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, या आजाराचा रूग्ण दहा वर्षांत एखादा आढळून येत असे. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून असे रुग्ण वाढत आहेत.
या आजारात डोळे आणि जबडा, दातांना त्रास सुरू होतो. कोरोना होऊन गेल्यानंतर डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, एकच वस्तू दुहेरी दिसणे अशी लक्षणे दिसतात, तर जबड्यांना व दातातून रक्त येण्याचे प्रकारही घडतात. कोरोनावर उपचार करताना देण्यात आलेली औषधे व त्याची मात्रा यामुळे हा बुरशीजन्य आजार बाधितांना जडत आहे.
सध्या सांगली, मिरज शहरातील रुग्णालयात सध्या सहा ते सात रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.