झटपट बॉडीबिल्डिंगचा नाद न्यारा, शरीराच्या नुकसानीचा खेळ सारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:40 PM2021-11-14T12:40:17+5:302021-11-14T12:41:10+5:30
बलदंड शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी तरुणांचा अलिकडे कल वाढतो आहे. मात्र योग्य मार्गदर्शकाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम आणि आहार म्हणून फूड सप्लीमेंटचा वाढलेला वापर शरीराला घातक ठरत आहे.
शरद जाधव
सांगली : बलदंड शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी तरुणांचा अलिकडे कल वाढतो आहे. केवळ तरुणच नव्हे तर इतर वयोगटातीलही आता जीमद्वारे व्यायाम करण्यास प्राधान्य देत असून, बॉडी बनविण्याचे फॅड वाढत आहे; मात्र योग्य मार्गदर्शकाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम आणि आहार म्हणून फूड सप्लीमेंटचा वाढलेला वापर शरीराला घातक ठरत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ शहरापर्यंत मर्यादीत असलेले जीमचे प्रस्थ आता गावोगावी पाेहोचले आहे. साधनाद्वारे व्यायाम करत शरीराला सुडौल बनविण्यासाठी आता प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मैदानाऐवजी जीममधील वावर वाढला आहे.
जीममध्ये व्यायाम करताना योग्य मार्गदर्शन आवश्यक असून, आपल्या शरीराला मानवेल यापेक्षा जादा व्यायाम केल्यास त्यातून व्याधींनी सर्व शरीर ग्रासण्याची भीती आहे. बॉडी तयार करत त्यातच करियर करणाऱ्या तरुणांकडून स्टुरॉईडचा वापरही केला जात आहे. यामुळे वरवर शरीर फुगले असले तरी प्रत्यक्षात त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचीच भीती आहे. प्रथिनयुक्त आहार शरीर कमविण्यासाठी आवश्यक असताना, अनेक जण फूड सप्लीमेंटचे डबेच्या डबे संपवून शरीराचे नुकसान करून घेत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
जीमची नो एण्ट्री घातकच
इतर कोणत्याही व्यायाम प्रकारात व्यायाम बंद केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत; मात्र जीममधील व्यायाम सुरू केला आणि तो बंद केल्यास त्याचे परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे शरीर कमविण्यासाठी या क्षेत्रात एण्ट्री आहे; मात्र बाहेर पडता येत नसल्याने आपल्या हातूनच आपण शरीराचे नुकसान करून घेत असल्याने योग्य ट्रेनरची निवड व त्याच्या मार्गदर्शनानुसारच केलेला व्यायाम आपल्याला हितकारक आहे.
सावध ऐका शरीराच्या हाका
जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्याच महिन्यात एका डॉक्टराचेही जीममध्येच निधन झाले हाेते. त्यामुळे जीममध्ये व्यायाम करताना घाम येणे, छातीचे ठोके वाढणे यांसह इतर लक्षणांवर लक्ष ठेवूनच व्यायाम सुरू ठेवावा, अन्यथा त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता आहेच.
बलदंड शरीरयष्टी कमविण्यासाठी केवळ फूड सप्लीमेंटची आवश्यकता नाही तर योग्य आहार हवा. ट्रेनरकडूनच जीममध्ये व्यायाम करावा. आपल्या शरीराला काय योग्य, याची पडताळणी करूनच व्यायामप्रकार निवडल्यास त्रास होणार नाही. - रामकृष्ण चितळे, ज्येष्ठ मार्गदर्शक
अगोदरच व्यसन असलेल्यांना जीममधील व्यायामाचा त्रास होतो. करियर करणाऱ्यांनीच फूड सप्लीमेंटचा वापर करावा. अन्य तरुणांनी योग्य मार्गदर्शकाद्वारे व्यायाम सुरू ठेवावा. दाखविण्यासाठी शरीरावर प्रयोग करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शनाखाली जीममधील व्यायाम फायद्याचाच ठरतो. - परशूदादा साबळे, अध्यक्ष, ॲमॅच्यूअर बॉडी बिल्डींग असोसिएशन