स्त्रियांवर वाढते अत्याचार चिंताजनक
By admin | Published: February 6, 2017 01:13 AM2017-02-06T01:13:00+5:302017-02-06T01:13:00+5:30
विद्या बाळ : तासगाव महिला महविद्यालयामध्ये चिंतन शिबिर
तासगाव : स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक असून, हे अत्याचार फक्त स्त्रियांबद्दल प्रश्न निर्माण करीत नसून, एकूणच पुरुषी व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
तासगाव येथील महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय, अंनिस व अक्षर सखी मंच आयोजित एक चिंतन - आणखी एक बलात्कार, आणखी एक खून, पुढे काय? या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. भिलवडी येथील स्त्री अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या असता, त्यांचा तासगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जातीव्यवस्थेने वेदनेचीदेखील जात ठरवली असून, बळी जाणारी स्त्री आणि दोषी पुरुष कोणत्या जाती धर्माचा आहे, याला देखील आता मोल येत असून, स्त्री अत्याचाराला जात धर्म नसतो, हे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी कोणत्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे काम केले याबाबत पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले. सध्याच्या जगात स्त्री-पुरुषांना व्यवस्था समानतेची व माणूसपणाची वागणूक दिली जात नसल्याने समाजाची अधोगती होत आहे. भांडवली व्यवस्थेने स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणूनच बघितले आहे. यामुळे समाजात महिलांकडे विकृत दृष्टिकोनातून बघण्याची पध्दत वाढीस लागली असल्याचे मतही विद्याताई बाळ यांनी व्यक्त केले.
पुरुष उवाच आणि मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या संपादिका डॉ. गीताली मंदाकिनी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, विजय कराडे, सुहासिनी कराडे, डॉ नामदेव कस्तुरे, डॉ सोनिया कस्तुरे, प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. कविता जाधव व छायाताई खरमाटे यांनी केले. फारूक गवंडी यांनी प्रास्ताविक, तर हेमलता बागवडे यांनी आभार मानले. गौरी फोजदार यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंनिसचे अमर खोत, कुंदन सावंत, अशोक पाटील, भास्कर सदाकळे, पांडुरंग जाधव, शरद शेळके, संजय पाटील यांच्यासह अक्षर सखी मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)